पुसद -वाशीम रस्त्यालगत असलेल्या येलदरी घाटातील वनविभागाच्या ‘स्मृतीवन उद्यानांची’ दुर्दशा ; पुसद वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष!

पुसद : शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पुसद-वाशिम राज्यमार्गावरील रस्त्यावर येलदरी घाटात वन विभागाची तब्बल ३ हेक्टर जमीन पडून आहे. येथे वनविभागाने मागिल काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करुन प्रत्येकाला काही क्षण दुःखाचे असल्यास ते आनंदाचे करता यावे यासाठी व या क्षणांना आठवणीत कायम गुंतून ठेवण्यासाठी तत्कालीन पुसद वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या संकल्पनेतून येलदरी घाटातील जंगल परिसरात ‘स्मृतीवन’ साकारण्यात आले. मात्र या सहा वर्षात पुसद वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या स्मृती वनाची संपूर्ण वाट लागली असून या स्मृतीवनात फार मोठी वृक्ष नसली तरी लहान झाडा-झुडपांनी व गवताने हा परिसर व्यापला आहे.
त्यामुळे या स्मृती वनांची रया पूर्णतया लयाला गेल्याने या स्मृतीवनावर देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री दाखवून हडप केला की काय?असा प्रश्न पर्यावरण प्रेमीं विचारु लागले आहेत या वनविभागाच्या संतापजनक प्रकारामुळे येथे येणाऱ्या पर्यटक,निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी असुन संताप व्यक्त करीत आहेत.
याबाबत सुत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, मागील वर्षी वर्षांपूर्वी पुसद शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पुसद-वाशिम राज्यमार्गावरील रस्त्यावर येलदरी घाटात वन विभागाची तब्बल ३ हेक्टर जमीनीवर वनविभागाच्या उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या संकल्पनेतून मोठा गाजावाजा करत शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करुन स्मृती वनांची निर्मिती करण्यात आली होती पुसद -वाशीम राज्यमार्गाला लागुन असलेल्या खंडाळा-येलदरी सागवृक्षराजाचा विलोभनीय परिसर आहे.त्याच राज्य मार्गाला लागुनच तीन हेक्टर क्षेत्रात वनविभागाने शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करीत या निसर्गरम्य स्मृतिवनाची निर्मिती करण्यात आली. या येलदरी पठाराला तीनही बाजूला दरी असून त्यावर १ हजार ८०० वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, चिंच अशा विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यासाठी मोठं मोठे खड्डे तयार करण्यात आले . त्यासाठी आठ खंडांची व्यवस्था केली होती. एखाद्या कुटुंबात बाळाचा जन्म झाला असेल, कुणाचे लग्न वा परीक्षेतील नेत्रदीपक यश असा आनंद प्रसंग या स्मृतीवनात आवडेल ते रोपटे लावून साजरा करण्याची तर कुणाच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास किंवा सुख-दुख: त्यांच्यासाठी या स्मृती वृक्षारोपणातून जपण्यासाठी तजवीज करण्यात आली होती.
एका बाजूला जवळच निसर्गरम्य तलाव, दुसऱ्या बाजूला येलदरी घाटाचा देखणा परिसर आणि पूर्वेस पुसद शहराचे विहंगम दृश्य असलेले या ठिकाणी पर्यटन विकासाच्या उद्देशाने वन उद्यानाची निर्मिती करण्यात आली. भव्य कमान, सुंदर चौकी, अंतर्गत रस्ते, पशु-पक्षांची माहिती देणारे फलक, सौरऊर्जेवर आधारित प्रकाश व्यवस्था, दुर्मिळ वृक्षवेली, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, तरुणांसाठी व्यायाम करण्याची व्यवस्था, पाण्याची टाकी अशा विविध सुविधा उभारण्यात आल्यात. परंतु उद्घाटनानंतरच्या काळात उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे स्थानांतर झाल्यानंतर वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व पुसद वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक या उद्यानाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे क्लेशदायक चित्र पाहावयास मिळत असल्याने या स्मृतीवनाची संपूर्ण वाट लागली आहे.शासनाचा कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले येलदरी स्मृतीवन सध्या अत्यंत दयनीय व दुर्लक्षित अवस्थेत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे पर्यटन स्थळ आज गवत ,झुडपे, वेली, अंधारमय अवस्थेचे प्रतीक बनलेले असून वनविभागाच्या निष्काळजीपणाचा हा जिवंत पुरावा ठरत आहे.आज उद्यानात पाच फूट एवढ्या उंचीचे गवत व निरोपयोगी झुडपे वाढलेली असून रस्ते झाकून गेलेली आहे. फलक तुटलेली असून इतर साधने मोडकळीस आलेली आहेत. सौरऊर्जेचे प्लेट , बॅटरी व दिवे चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर अंधार व ओसाड पडलेला पाहायला मिळतो . सुरक्षेचा व देखभालीचा अभाव गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.दूरदृष्टी असलेल्या वन अधिकाऱ्याने उभारलेले हे स्मृतीवन नंतरच्या अदूरदर्शीपणा व बेजबाबदार अधिकाऱ्यांनी या स्मृति वनाची कुठलीही काळजी घेतली नाही. सध्याच्या वन अधिकाऱ्यांना या स्मृती वनाशी काही देणे घेणे नसल्याचे एकंदरीत दिसून येते. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यावधीच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे .या प्रकल्पावर झालेला नेमका खर्च देखभाल निधीचा वापर आणि जबाबदार अधिकाऱ्याची भूमिका याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती समोर येत नसल्याने देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री दाखवून हडप केला की काय असा प्रश्न निसर्गप्रेमी उपस्थित करीत आहेत.त्यामुळे या वनविभागाच्या संतापजनक प्रकारामुळे येथे येणाऱ्या पर्यटक,निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी असुन संताप व्यक्त करीत आहेत.सार्वजनिक निधीचा असा अपव्याय असाह्य असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमीच्या वतीने करण्यात येत आहे .
स्मृतिवन जपा, पर्यटन वाढवा.. !
पुसद -वाशिम राज्य मार्डागांवर असलेल्या येलदरी-खंडाळा घाटाला वन वैभव प्राप्त झाले. येलदरी स्मृति वनामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यासाठी वन अधिकाऱ्यांची कार्यमग्नता हवी. डीएफओ अरविंद मुंढे सारखे वनाबद्दल जिव्हाळा असणारे अधिकारी स्मृतीवन उभारू शकतात. विद्यमान डीएफओ डॉ.स्वामी यांना मात्र वनाचा कुठलाही लळा दिसून येत नाही. अशा निष्क्रिय उपवनसंरक्षण अधिकाऱ्यामुळे तसेच पुसद वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आता येलदरी स्मृती वनाची कळा गेली आहे त्यामुळे या उद्यानाची तात्काळ दुरुस्ती, नियमित देखभाल व सुरक्षेची व्यवस्था सुरू करावी . पुसदकर पर्यटक व निसर्गप्रेमीसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः पुढाकार घेऊन येलदरी स्मृतीवनाचे पुनरुज्जीवन व पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी पर्यावरण व निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे.



