ईतर

पाणंद ग्रस्त शेतकरी पांडुरंग आंडगे यांचे तिसऱ्यांदा उपोषण:तहसील प्रशासन कुंभकर्णी झोपेत!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):- शेताकडे जाणारा पाणंद रस्ता खुला करून जाण्या येण्याजोग्य करून देण्यात यावा यासाठी शेतकर्‍यावर तिसर्‍यांदा उपोषण करण्याची वेळ आली आहे. असून एकदा आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी १५ ऑगस्ट २०२३ ला दिला होता परंतु त्यांना पोलीस प्रशासनाने १४ ऑगस्टला ताब्यात घेतले होते आता मात्र शेतकरी तिसऱ्यांदा महागाव तहसील समोर उपोषणास बसले आहे पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून मिळाला नाही तर महागाव तहसिल कार्यालयासमोर उपोषण मंडपातून अपली अंत्ययात्राच निघेल असा ठोकरी इशारा अन्यायग्रस्त शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांनी दिला आहे.

शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता वहीवाटीस मोकळा करून देण्यात यावा या जुजबी मागणीसाठी पांडुरंग आंडगे तब्बल अडीच वर्षापासून प्रशासकिय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत, परंतु कुंभकर्णी प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधी व यंत्रणेचे डोळे उघडावे यासाठी शेवटचा पर्याय म्हणुन आता उपोषण मंडपातच जीव सोडण्याचा निर्धार पांडुरंग आंडगे यांनी केला आहे. पाणंद रस्त्यासाठी या हतबल शेतकर्‍याने यापुर्वी दोन वेळा उपोषण केले.

मागील वर्षी तर आंडगे यांनी चक्क बैलबंडीसह महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या अभिनव आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. आता पुन्हा आज २५ ऑक्टोबर पासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे हिवरा येथील शेतकरी पांडुरंग आंडगे आणि जीवन आंडगे १ हेक्टर ४१ आर शेती आहे. हिवरा जिनिंग फॅक्टरीला लागून असलेला पाणंद रस्ता हा शेताकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

हा पाणंद रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून शेतात जाण्यास वाटच राहिली नाही त्यामुळे पांडुरंग आंडगे यांच्या शेतातील ऊस कारखान्यापर्यंत नेता आला नाही. यात शेतकऱ्याचे आठ लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा या मागणी साठी पांडुरंग आंडगे मार्च २०२१ पासून सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. यापुर्वी त्यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा उपोषण केले. आजवर त्यांनी प्रशासनाकडे शेकडो निवेदने दिली, परंतू या शेतकऱ्याची तक्रार अजुनही बेदखलच आहे. संवेदनशुन्य व्यवस्थेला जागे करण्यासाठी आंडगे यांनी अभिनव उपोषण सुरु केले होते. बैलबंडी घेऊन ते मंडपात तळ ठोकून बसल्याने त्यावेळी यंत्रणा चांगलीच गोत्यात आली होती. आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून पांडुरंग आंडगे यांच्या उपोषणाची सांगता केली होती,परंतू त्यानंतरही हा प्रश्न जशास तसा कायम राहिला आहे. पांडुरंग आंडगे यांनी सन २०२२ मध्ये आपल्या शेतात उसाची लागवड केली होती. उसाचे पीक परीपक्व झाल्यानंतर साखर कारखान्याकडे नेण्यासाठी आंडगे यांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना विनंती करून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. परंतु पाणंद रस्ता खुला करण्यात आला नाही त्यामुळे संपूर्ण ऊस शेतातच वाळून गेल्यामुळे आंडगे यांचे ८ लाखावर नुकसान झाले होते. पांडुरंग आंडगे यांनी तहसीलदारांकडेही वारंवार निवेदने दिली व पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी केली.कुंभकर्णी तहसील प्रशासन कोणतीच हालचाल करीत नसल्यामुळे त्यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी वादग्रस्त पाणंद रस्त्याची प्रशासकीय स्तरावरून मोजणी करून अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करण्यात येईल अशी हमी दिली होती.वाळून गेलेल्या ऊसाची नुकसान भरपाई देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते परंतु हे आश्वासन हवेतच विरले त्यामुळे आता २५ ऑक्टोबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आंडगे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार महागाव, ठाणेदार महागाव, यांना दिनांक १७ ऑक्टोंबर ला निवेदनाद्वारे दिला होता न्याय मिळाला नाही तर या उपोषण मंडपातून आपला मृतदेहच बाहेर जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. कुंभकर्ण झोपेत असलेले तहसील प्रशासन करते तरी काय हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close