नाल्याच्या पुरात वाहत गेल्याने मृत्यूमुखी पडलेल्या शिवमच्या कुटुंबाला शासनातर्फे ४ लाखाचा धनादेश!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव तालुक्यातील गुंज येथील शिवम सुरेश रावते हा तरुण नाल्याच्या पुराच्या प्रवाहात वाहून गेला होता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच हाती लागला. शुभमच्या मृत्यूने रावते कुटुंबावर दुःखाचा डोगरच कोसळला शासनाच्या नैसर्गिक आपत्कालीन मदत निधीतून ४ लाखाची मदत या पिडीत कुटूंबाला आज दि .१२ जुलैला देण्यात आली. महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे,नांदेडचे माजी महापौर दलितमित्र किशोर भवरे,उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे आणि तहसीलदार संजीवनी मुपडे यांच्या हस्ते मृतक शिवमची आई जयश्री सुरेश रावते यांना मदतीचा धनादेश सोपविण्यात आला.महागाव तालुक्यातील गुंज येथील दोन तरुण नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवार ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. गुंज आणि परिसरात मंगळवारी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला होता काही वेळातच छोटे मोठे नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. गुंज बसस्थानकाकडून गावात जाणाऱ्या छोट्या नाल्यालाही पूर आला होता. शिवम रावते आणि अमोल चव्हाण हे दोघे मित्र नाल्याच्या अरुंद पुलावरुन वाहत असलेल्या पुरातून वाट काढत पुढे जात असताना जोरदार प्रवाहाने दोघेही नाल्याच्या पुरात वाहून गेले. अमोल हा काही अंतरावर महत्प्रयासाने बाहेर आला, मात्र शिवम वाहून गेला. गावकर्यांनी त्याचा युद्ध पातळीवर शोध घेतला परंतू त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. तहसीलदार संजिवनी मुपडे, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे हे माहिती मिळताच प्रशासकिय ताफा लगेच घटनास्थळी रवाना झाले. रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी यवतमाळ येथून एनडीआरएफ च्या चमूस पाचारण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबविण्यात आली तरीही शुभमचा रात्रभर शोध लागला नाही. गुंज येथील तरुणांनी बुधवारी भल्या पहाटेच नव्या दमाने शोधमोहिम हाती घेतली. दोन कि.मी. अंतरावरील हिवरदरी गावानजीक नाल्याच्या काठावर शुभम रावते या तरुणाचा मृतदेहच आढळून आला होता. शुभमला एक जुळा भाऊ व एक बहीण आहे. वडीलांचा वर्षभरापुर्वीच मृत्यू झाला असून रोजमजुरी करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थित अत्यंत नाजुक आहे.
शासनाकडुन या कुटुंबास ४ लाखाची मदत देण्यात आली.आमदार नामदेवराव ससाणे,नांदेडचे माजी महापौर दलितमित्र किशोर भवरे,उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार संजीवनी मुपडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विलास शेबे, योगेश वाजपेयी, पत्रकार सचिन उबाळे, सामाजिकता कार्यकर्ते प्रमोद जाधव यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.यावेळी मृतक शिवमची आई जयश्री सुरेश रावते, बहीण स्वाती रावते, भाऊ शुभम रावते, काका दिनेश रावते,संतोष रावते,प्रकाश रावते, पांडुरंग यादव, चंपतराव खंदारे, गजानन पवार, पत्रकार हरी खंदारे, दत्ता हिंगडे, तलाठी ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते.



