श्री शिवाजी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात गणतंत्र दिवस संपन्न!

पुसद: श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य शिक्षण संकुलाच्या प्रांगणात गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा मुख्याध्यापक रामचंद्र हिरवे तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण वानखेडे, उपमुख्याध्यापक दत्तात्रेय जीवने, पर्यवेशक प्रज्ञा गडदे, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य रोहन शिंदे उपस्थित होते. सर्वप्रथम प्राचार्य रामचंद्र हिरवे यांच्या हस्ते मुख्य इमारतीवर ध्वजवंदन करण्यात आले. एन सी सी ऑफिसर विजय डोंगरे व त्यांचे पथक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.त्यानंतर राष्ट्रगीत, राज्य गीत, संविधान , असाक्षरतेची शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी समयोचीत भाषण केले. त्यातूनच वर्ग ९ची सरगम काशिनाथ चव्हाणचे हिंदीतील भाषण विशेष प्रभावी ठरले. NCC परेड, कवायत, सायकल कवायत, देशभक्तीपर गीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांमुळे कार्यक्रमास रंगत आली. वर्ग ९ व १०च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या उत्कृष्ट संगीत नाट्याचे सादरीकरण केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी गणतंत्र दिवस व संविधानाचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग कोरटकर, शिल्पा कदम व वृषाली खैरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. योगिता काष्टे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी विशेष पुढाकार घेतला.



