राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची चरण पादुका पालखी २१ जुलैला पुसदमध्ये; गुरुदेव सेवा मंडळाकडून स्वागताची जय्यत तयारी!

पुसद : संत परंपरा केवळ भक्तीची नसून सेवा, समर्पण आणि समाजाला एकत्र आणण्याचीदेखील शक्ती आहे. याच भावनेतून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुकांसह पंढरपूर प्रचार यात्रा २१ जुलैला सकाळी १० वाजता पुसदमध्ये दाखल होत आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखा आणि सर्व गुरुदेव अनुयायी सज्ज झालेआहेत. 
अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज आश्रम, मोझरी येथून निघालेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची चरण पादुका पालखी केंद्रीय प्रचार विभागाचे प्रचार प्रमुख तथा पालखी संयोजक गोपाल कडू, सचिव तथा पालखी व्यवस्थापक डॉ ज्ञानेश्वर मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर वारीकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. सोबत भजन संच ध्यान, प्रार्थना, कीर्तन, भजन, प्रवचन व वाड्.मयाद्वारे महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हेच पालखी प्रचार यात्रेचे उद्दीष्ट आहे.
२१ जुलै रोजी पालखीचे आगमन
पुसद शहरामध्ये राष्ट्रसंतांची चरण पादुका पालखीचे आगमन, स्वागत, दर्शन, मार्गदर्शन व महाप्रसादाची परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे. यंदा २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्थानिक विरंगुळा केंद्र सभागृहात पालखीचे स्वागत राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्ष ॲड मोहिनी नाईक हस्ते आयोजित आहे. पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेव अनुयायांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे विनंती गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, सचिव ॲड गजानन साखरे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, भजन प्रमुख माधवराव जाधव, यशवंत देशमुख, नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, ज्ञानेश्वर ताकतोडे, प्रमोद जयस्वाल, शरद राऊत, विठ्ठल येवले, बाबासाहेब वाघमारे, राजू पुरी, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, संध्या पवार, माधुरी वांझाळ, शीला जाधव, जया मोरे, आदींनी केली आहे.



