पुसद पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी म्हणून ए.डी. आंदेलवाड रुजू!
तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतीच्या विविध योजनेच्या कामातील भ्रष्टाचार संपविण्याचे मोठे आवाहन!

पुसद : तालुका हा आदिवासी व बंजारा बहुल असल्याचा ओळखला जातो.गेल्या काही वर्षापासून पुसद पंचायत समितीचा कारभार ‘प्रभारी’भराेसे असल्याने ग्रामीण भागातील विकास कामांना खिळ बसली होती आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. या पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळणार तरी कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून आता पुसद पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामाला गती मिळणार आहे. आज दि.२५मार्च २०२५मंगळवार रोजी पुसद पंचायत समितीला पूर्ण वेळ गटविकास अधिकारी म्हणून ए.डी.आंदेलवाड रुजू झाले आहेत. नवनियुक्त गटविकास अधिकारी ए.डी.आंदेलवाड यांची स्वच्छ प्रतिमा असल्याची ओळख आहे मात्र त्यांच्यापुढे पुसद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेतील विकास कामात होणारा भ्रष्टाचार रोखण्याचे आवाहन आहे.
त्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दलित वस्तीचे कामे, रस्ते, बंदिस्त नाली सिमेंट काँक्रीट रस्ते ,समाज भवन,१५ व्या वित्त आयोग अंतर्गत होणारी कामे, केंद्र व राज्य शासनाची महत्त्वकांक्षी असलेली घरकुल योजनेत होणारा भ्रष्टाचार, रोजगार हमी योजनेतील विहिरीच्या कामातील भ्रष्टाचार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील विहिरीच्या कामात भ्रष्टाचार,पेवर ब्लॅक बसविणे कामात भ्रष्टाचार, वस्तू खरेदी, हायमास्क लाईट खरेदी, आरो प्लांट, जिल्हा परिषद शाळेचे वॉलकंपाउंड बांधकाम व जलजीवन मिशनचे अर्धवट रखडलेले कामे व अनेक गावातील भीषण पाणी टंचाई इतर अनेक कामे तसेच अनेक कामे तालुक्यात सुरू आहे. यातील अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याने व नित्कृष्ठ दर्जेचे कामे करण्यात आल्याची जनतेतून ओरड सुरू आहे. 
नवनियुक्त रुजू झालेले गटविकास अधिकारी यांना सर्वात जास्त त्रास राजकीय ठेकेदार व पुढाऱ्यांचा होणार हे निश्चित. कारण वरील कामे करणारे सर्वाधिक ठेकेदार हे राजकीयच असल्याने मोठा त्रास सहन करावे लागणार आहे. परंतु स्वच्छ व चांगले काम करणारे लोकांना संधी देऊन तसेच राजकीय दबावाखाली न येता नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यानी कार्य करावे अशी अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.तालुक्यात १२० ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींना येणारा निधी पंचायत समितीचा कारभार प्रभावर असल्यामुळे भ्रष्टाचारी वृत्तीमुळे या ग्रामपंचायती पर्यंत झिरपत चालला होता.त्यामुळे यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीचा खच पडला होता. पण या पंचायत समितीचा कारभार प्रभाव असल्यामुळे अशा भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या तरीही या तक्रारीचे निरांकर करण्यास भ्रष्ट अधिकारी तयार नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष,व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा तसेच टक्केवारीमध्ये अडकलेले गुत्तेदार यांच्या मिलीभगतमध्ये ग्रामीण भागातील विकास कामाची पुरती वाट लागली आहे.अनेक ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती मार्फत होणाऱ्या विविध योजनेतील कामात होणारा भ्रष्टाचार थांबवावा व पूर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळावा यासाठी जनता अपेक्षा बाळगून होती. यापूर्वी गटविकास अधिकारी पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून संजय राठोड यांनी प्रभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात प्रभार स्वीकारला तेव्हापासून तालुक्याच्या ग्रामीण भाागातील विकास कामांवर मोठा विपरीत परिणाम झाला होता. ग्रामीण भागातील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी जनतेची मागणी आहे.नवनियुक्त गटविकास अधिकारी ए.डी.आंदेलवाड हे पंचायत समिती अहमदपूर जिल्हा लातूर येथे कार्यरत होते परंतु महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव डॉ.उर्मिला वैभव जोशी यांच्या स्वाक्षरीने दि.२४ मार्च २०२५ रोजी आदेश काढून तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले त्यानुसार ए.डी.आंदेलवाड यांनी आज पुसद पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यावर पुसद तालुका ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने व पत्रकार बांधवच्या वतीने तसेेेच अनेक मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परंतु त्यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यापुढे विविध कामातील भ्रष्टाचार संपविण्याचे मोठे आव्हान आहे.



