पुसद सार्वजनिक बांधकाम विभागात निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराविरुद्ध पुसद काँग्रेस पदाधिकार्यांचे साखळी उपोषण!
निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबात ठेवणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करा!

पुसद : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध विकास कामांसाठी निविदा प्रकाशित केल्या जात आहेत.“पुसद सार्वजनिक बांधकाम आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. शासनाच्या निधीतील करदात्यांच्या पैसा स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंती आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा निधी लुटला जात आहे, स्थानिक आमदार तथा मंत्र्यांच्या आशीर्वादाने निविदा प्रकि‘येत मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे, असा खळबळ जनक आरोप पुसद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला असून पुसद तालुका काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.दि.२३फेबुरवारी२०२६ पासुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने साखळी उपोषण सुरू केले आहे.संबधित विभागाने तात्काळ दखल घेतली नाहीतर हे आंदोलन अधिक तीव‘ करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत उपोषण कर्त्यानी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्र्याच्या दबावाखाली मर्जीतील कंत्राटदाराला काम देता येईल यासाठी चार-चार, पाच-पाच महिने निविदा न उघडणे, शासकीय कंत्राटदारांना निविदा सादर करण्यापासून रोखणे, काही कंत्राटदारांना धमक्या देणे, कोण्या एका कंत्राटदाराने निविदा सादर केली तर निविदा सादर करणार्या कंत्राटदाराकडून वारंवार जाणिवपूर्वक कागदपत्राची मागणी करणे किंवा दुसरे कागदपत्रे सादर करू नका, असा दबाव टाकने हे सर्व या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सुरू आहेत. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. त्यामुळे या विभागा मार्फत सुरू असलेल्या विविध कामाचा संपूर्ण दर्जा खालावला आहे. मागील वर्षभरात संबंधित कंत्राटदारांकडून झालेली कामाची सखोल चौकशी केली तर ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे पाहावयास मिळत आहेत.त्यामुळे जनतेच्या कराच्या पैशाची व शासनाच्या निधीवर येथील लोकप्रतिनिधी व या विभागाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता अधिकारी डल्ला मारत आहेत त्यामुळे हे उघड डोळ्यांनी दिसून येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह पुसदच्या नवीन बांधकामाकरिता सुमारे ६ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाली होती. मात्र ती अजूनही उघडण्यात आलेली नाही. ही निविदा उघडण्याबाबत २७ जानेवारी २०२६ रोजी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु ही निविदा उघडण्याबाबत २० फेब्रुवारीपर्यंत या विभागाने कार्यवाही केली नाही. या अनागोंदी कारभारामुळे पुसद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार, २३ फेब्रुवारी२०२६पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सुरू झाल्यामुळे निविदा उघडण्यासाठी या विभागाची धावपळ सुरू आहे. मात्र निविदा उघडणे हा प्रश्न आज राहिलेला नाही. उघडण्याकरिता कुठलेही तांत्रिक कारण नसताना चार पाच महिन्यांचा कालावधी लावल्याने या दिरंगाईसाठी जबाबदार अधिकारी अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे.या मागणीची संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.



