पांढुर्णा केदारलिंग येथे वनविभागाने बांधलेला बंधारा फुटला अन् शेतात पाणी घुसले, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान!
वनविभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील पांढुर्णा केदारलिंग भागात जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन प्राण्याची तहान भागविण्यासाठी शासन लाखो रुपये निधी खर्च केला मात्र कंत्राटदार व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बंधाऱ्याचे बांधकाम केले गेले असूनहा बंधारा अल्पवधीतच पूर्णपणे फुटला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अधिकार्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शासनाच्या लाखो रुपये निधीचा चुराडा झाला आहे.
पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पांढुर्णा केदारलिंग येथील जंगलात सुमारे दोन वर्षांपूर्वी शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन प्राण्याची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने लाखो रुपये शासनाचा निधी खर्च करून बंधारा बांधण्यात आला होता परंतु कंत्राटदार व वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगणमताने या वन बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे सप्टेंबरमध्ये सुरवातीला झालेल्या पावसामुळे हा बंधारा फुटला. या बंधाऱ्याचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी नुकतेच वनपरिक्षेत्र अधिकारी मारवाडी यांच्या तक्रार व निवेदन दिले असून यामध्ये आठ दिवसाच्या आत सर्व शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.या निवेदनावर प्रभाकर काईट, वामनराव काईट, प्रमोद काईट ,नामदेव काईट ,प्रल्हाद काईट, दिनेश कोपनर व साहेबराव काईट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संबंधित शेतकऱ्यांनी मला कालच निवेदन दिले असून मी पंचनाम्यासाठी कर्मचारी पाठविलेले आहेत परिसरात किती प्रमाणात नुकसान झाले त्याचा पंचनामा करून मी पुढील कारवाई करेल. –विशाल झांबरे,वनपरिक्षेत्र अधिकारी मारवाडी बीट



