जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था र.नं.१०९ची आमसभा वादळी!तिस कोटीच्या ठेवीची हेराफेरी झाल्याचा सभासदांचा वस्तुनिष्ठ आरोप!

पुसद:यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत एका पतसंस्थेकडून कागदोपत्री ३० कोटीच्या ठेवी घेतल्याची बतावणी करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रकार आजच्या आमसभेत जागरूक सभासदांनी उघडकीस आणल्याने अध्यक्षाची भंबेरी उडाली. अध्यक्षांनी केलेल्या नियमबाहय कामाबाबत आक्रमक सभासदांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने निरूत्तर होवून सभा आटोपती घेण्याची नामुष्की अध्यक्षावर आल्यामुळे पतसंस्थेचे कामकाज संशायाच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोप आमसभेत अनेक सदस्यांनी केला. सदस्याच्या आक्रमकतेमुळे आमसभा आठ मिनिटांत गुंडाळल्याची नामुष्की अध्यक्षावर ओढवली. याबाबत प्राप्त माहिती अशी की,यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था .नं. १०९ ची आमसभा आज पुसद येथे मधुकर काठोळे यांच्याअध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये पतसंस्थेने एका दुसऱ्या पतसंस्थेकडून ३० कोटीच्या ठेवी घेतल्या परंतु ती रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात जमाच झाली नाही. ३० कोटी रूपयाची एवढी मोठी रक्कम परस्पर कोठे गेली ? याबाबत सभासदांनी प्रश्नाचा भडीमार केला. अपघात विम्यामध्ये १३ लाख रूपये अधिकचे आकारून सभासदांचा विश्वासघात केल्याचा आरोप आज आमसभेत करण्यात आला. कुटूंब आधार योजना नफ्यातून राबविण्याचे आश्वासन असतांना प्रत्येक सभासदांच्या खात्यावर तिन हजार रूपये कर्ज टाकुन सभासदांचा प्रचंड विश्वासघात केल्याचा आरोप देखिल आमसभेत करण्यात आला. संचालक प्रवास खर्च, आदरातिथ्य खर्च, कोर्ट खर्च आदी वारेमाप खर्च केल्याबाबत सभासदांनी तीव्र आक्षेप घेतला. नोकर भरती करू नये यासाठी न्यायालयात दाद मागणारे सत्ता मिळताच नोकर भरती करू द्यावी याकरीता उच्च न्यायालयात दाद मागत आहेत, ही बाब अत्यंत निंदनिय असल्याची चर्चा आमसभेत होती. सहकार कायद्याच्या तरतुदी न करता बोगस नफा दाखवून सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप सभेत सभासदांनी केला. नगर पालीकेची परवानगी घेता बांधकाम करणे, सभासदांची सहमती नघेता कुटूंब आधार योजना व अपघात विमा या योजनेचे हे तर अंशी रूपये प्रत्येकाच्या खात्यावर कर्ज टाकणे, मासिक ठेवीचे व्याज न वाढविणे, कर्ज व्याजदर एक अंकी न करणे, सभासदांना योग्य वेळी कर्ज न देणे, संस्थेच्या पैशाची उधळपट्टी करणे इत्यादी प्रश्नामुळे आजची आमसभा अत्यंत वादळी ठरली. यवतमाळ जिल्हयातील सभासदांना २३ आश्वासने देऊन सत्तारूढ झालेल्या संचालक मंडळाने एकाही आश्वासनाची पुर्तता न करणे म्हणजेच सभासदांची प्रतारणा असल्याची खंत अनेक सभासदांनी सभेत व्यक्त केली.पतसंस्थेचे खाजगीकरण होवू देणार नाही अशी घोषणा करून सत्तारूढ झालेल्या संचालक मंडळांनी खाजगी सभासद करण्याचा सपाटा लावला असून अद्यापही उपविधी दुरूस्त केली नाही. सेवानिवृत्त व्यक्ती अध्यक्षपदावर नको म्हणून टाहो फोडून न्यायालयात जाणारे अध्यक्ष ३० जुनला सेवानिवृत्त होत आहे. तेव्हा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार काय? असा सवाल आमसभेत केला असता अध्यक्षांची भंबेरी उडाली… एका वर्षातच सभासदांवर सातत्याने होणारे अन्याय व आर्थिक शोषन लक्षातघेता सत्ताधाऱ्यांना निवडुन देण्यात आपली चुक झाल्याची भावना सभास्थळी अनेक सभासदांनी व्यक्त केली. पतसंस्थेत सुरू असलेल्या भष्ट्राचाराबाबत व अनागोंदी कारभाराबाबत जागरूक सभासद अत्माराम चव्हाण, रमेश धावंडकर, दादाराव देशमुख, विजय मिराशे, शशिकांत खडसे, सुरेश पवार, भास्कर डहाके, रवि राठोड, अनिल, सरतावे, अनिल भालेराव, गजानन ठकारे, सचिन इंगोले, प्रभाकर बाबेडे, अजय अक्कलवार, प्रविण दरेकर आदी सदस्यांनी आजच्या आमसभेत आवजा बुलंद केला.



