गर्भवती मातेचा आहार बाळाच्या निरोगी आयुष्याचा आधार वृषाली वडत्या नाईक : पुसद येथे बाळ आरोग्य व गर्भसंस्कार कार्यशाळा

पुसद : गर्भवती मातेचा आहार हा बाळाच्या निरोगी आयुष्याचा मुख्य आधार असून बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण युक्त आहार आवश्यक आहे. तसेच गर्भसंस्कार ही काळाची गरज आहे, असे मत आहारतज्ज्ञ तथा वेदवीर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष वृषाली वडत्या नाईक यांनी व्यक्त केले.
वेदवीर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार ता. एक रोजी आयोजित योगा भवनात करण्यात आलेल्या ‘ विशेष माता- बाल आरोग्य व गर्भसंस्कार ‘ या विषयावरील मोफत कार्यशाळेच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. अनन्या ग्रुपने ‘कोणीतरी येणार येणार ‘ ये नृत्यगीत सादर केले. यावेळी ‘गुलाबी की निळा’ बाळाच्या आगमनाचा आनंद सहभागी महिलांनी साजरा केला.
यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मीरा डांगे यांनी ‘स्त्रीचे आरोग्य व मातृत्व ‘ यावर भाष्य केले. त्यांनी स्त्रीच्या मातृत्वाचा प्रवास अतिशय रंजकपणे सांगितला. बाळाचे लसीकरण यावर त्यांनी माहिती दिली आई व बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार आणि विचार आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. डॉक्टर टीना राठोड यांनी शारीरिक व्याधींवर करण्यात येणारी ‘कलर थेरपी ‘
सोप्या भाषेत सांगितली. झोप न येणे, चिडचिडपणा, ऍसिडिटी,युरीन इन्फेक्शन यावर ही थेरपी उपयुक्त असल्याचे त्या म्हणाल्या.डॉ. देविका राठोड यांनी ‘श्वसन व्यायाम आणि मंत्र उच्चारण ‘ या विषयावर उपयुक्त माहिती सांगितली. श्वसनाचे व्यायाम म्हणजे केवळ श्वास घेणे आणि सोडणे असे नव्हे तर आईचे बाळाशी जोडले जाण्याचा सुंदर अनुभव असतो असे त्या म्हणाल्या. प्राध्यापक डॉक्टर रंजना जीवने यांनी गर्भवती महिला आणि कुटुंब यांच्यातील संवाद कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर अमोल गुद्दटवार यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांबद्दल माहिती दिली.नॉर्मल डिलिव्हरी साठी घरातील वातावरण आनंदी असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योगा आणि ध्यान तसेच सूक्ष्म व्यायाम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाल कैलास जाधव यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा उहापोह केला. सूत्रसंचालन डॉ. माधवी गुल्हाने यांनी केले. या कार्यशाळेत बाळाविषयी उत्कृष्ट विचार भावी मातांनी व्यक्त केले त्यातील उत्कृष्ट विचारांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला गर्भवती महिला तसेच वनिता विकास महिला मंडळाच्या ज्येष्ठ सदस्य डॉ. सुनिता हळदे, विजय माला देशमुख, शोभाताई नाईक, शुभांगी चिद्दरवार, पल्लवी देशमुख उपस्थित होत्या.



