सोयाबीन वरील यलो मोझॅक व्हायरसचे मंडळनिहाय सर्वेक्षण करा!-खासदार भावनाताई गवळी यांचे निर्देश

यवतमाळ : जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. या व्हायरसमुळे सोयाबीन पीक पिवळे पडून वाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मोबदला व शासनाकडून मदत मिळावी यासाठी यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे मंडळनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे,असे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी संबंधित यंत्रणा दिले आहे
.गेल्या काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी पेरणीच्या वेळी वेळेवर पाऊस न आल्याने पेरणीचे कामे लांबले होती. तसेच मध्यंतरी सुद्धा पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाला अपेक्षित मालधारणा झाली नाही. पावसाचा अनियमितपणा व वातावरणातील बदलामुळे आता सोयाबीन पिकावर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या यलो मोझॅक व्हायरसमुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडून वाळत आहे. तसेच ज्या शेतातील पिकाला मालधारणा झाली, त्या सोयाबीनच्या शेंगाला काळे ठिपके पडून पानगळ होत आहे. या यलो मोझॅकचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम पडणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे दिसून येते.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मोबदला व शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी यलो मोझॅक व्हायरसचे महसूल मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच या संदर्भात पंचनामे करण्याचे निर्देश विमा कंपनीला देण्यात यावे अशा सूचना देखील खासदार भावनाताई गवळी यांनी संबंधित यंत्रणेला केल्या आहेत.



