पुसद येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती!

पुसद: येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाचा उद्देश लोकांना रानभाज्यांचं महत्त्व, त्यांचं पोषणमूल्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देणं हा होता. आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक खाद्य पदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी, आदिवासी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते,शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि अदी नागरिकांनी उपस्थित रहावं, असं आवाहनच पुसद चे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि महोत्सवाचे आयोजक अमोल मेतकर यांनी केलं होतं.या महोत्सवामध्ये आदिवासी बांधवांनी गोळा केलेल्या विविध भाज्या आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली.या महोत्सवामध्ये रानभाज्या आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीचे विविध स्टॉल होते. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर होते. उद्घाटन उपविभागीय अधिकारी आशीष बिजवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मभूषण राजगुरू, शशांक कदम, विजय मुकाडे, अमोल आघव, अनिल पाटील व दिनकर गुल्हाणे संदीप राऊत प्रकल्प कार्यालय अधीक्षक अनिल इंगळे व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महोत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये फांज, कुटुळे, हडसन,चिलभाजी, आवळा, रानकांदा, वावडींग, पडवळ, रानशेरण्या, गुळवेल, रानघोळ, पिंपळवेल, गावराण भेंडी, आवांडी अदी रानभाज्यांचा समावेश होता.या रानभाजी महोत्सवात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा आणि वडगाव (शिंदे) येथील विद्यार्थ्यांनीही रानभाज्यांचे स्टॉल लावून सहभाग नोंदविला. उपस्थितांना रानभाज्यांची माहिती देण्यात आली तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रानभाज्यांची खरेदी केली.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी, आदिवासी पालक व बंधू-भगिनींना रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि त्यांचा आहारातील उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी हंगामातील रानभाज्या व त्यांच्या उपलब्धतेची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल मेतकर यांनी आदिवासी बांधवांना रानभाज्या उपलब्ध होण्यासाठी बाजारपेठेत जागा उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली. सेवा संकल्प अभियानांतर्गत रानभाजी महोत्सव व लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करीत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत कोटरवार यांनी केले. सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन अरुण चव्हाण यांनी केले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रानभाजी महोत्सव यशस्वीपणे पार पडला.



