क्राइम

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईच्या बागेतील तिनसे वृक्षाची अज्ञाताने केली कत्तल ; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान!

निंबी -पार्डी शेतशिवारातील शेतकरी भुरट्या चोरांमुळे त्रस्त!

पुसद: तालुक्यातील निंबी-पार्डी शेत शिवारातील शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. निंबी- पार्डी शेत शिवारातील बाबाराव अंभोरे पाटील यांच्या शेतातील दोन एकरात लागवड केलेल्या पपईं वृक्षाच्या बागेतील जवळपास वृक्षाची अज्ञात माथेफिरूने कत्तल केल्याची घटना रविवार ता.६ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची तक्रार वसंतनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात असून अज्ञात माथेफिरुचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील निंबी – पार्डी रस्त्यावरील शेत शिवारात बाबाराव अंभोरे या शेतकऱ्याचे शेती आहे. या शेतात त्यांनी पार्डीचे विठ्ठल जाधव यांच्यासोबत बटईने दोन एकर क्षेत्रात पपई वृक्षाची लागवड केली होती व या शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करुन पपई वृक्षाची ही बाग जगवलेली होती. सुरुवातीला त्यांनी या शेतातील रानात टरबुजाचे आंतरपीक घेतले. त्यावेळीही त्यांच्या शेतातून २ टन टरबूज चोरीला गेले. या शेतातील लागवड केलेल्या एकूण २३०० वृक्षापैकी अज्ञात माथेफिरूने रविवारच्या भल्या पहाटे धारदार शस्त्राच्या साह्याने पपईच्या ३०० वृक्षांची कत्तल केली. तर काही पपईचे वृक्ष उपटून टाकले तर काही वृक्ष पायाने मोडली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे मोठे नुकसान झाले. यापूर्वीही काही मोजकी वृक्ष अशाच प्रकारे तोडण्यात आलेली होती. मात्र रविवारच्या घटनेने कळस गाठला. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अपप्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला. आधीच शेतकरी संकटात असताना या दुष्टप्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या घटनेची माहिती सुरुवातीला निंबी येथील पोलीस पाटील रामराव काळे यांनी वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना कळविले. आणि नंतर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. या प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन दिले.अशी माहीत सुत्रांनी झेप न्यूज दिली आहे.

भुरट्या चोरांचा शेतकऱ्यांवर डोळा….. 

निंबी – पार्डी शिवारात मोठ्या प्रमाणात ओलीत क्षेत्र असून भाजीपाला तसेच फळ पिके घेण्यात शेतकरी अग्रेसर आहेत. पूस धरणाच्या कॅनॉलचे पाणी उपलब्ध असल्याने जमीन सिंचनाखाली आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कॅनॉलवर तसेच विहिरींवर मोटर पंप भरपूर आहेत. या शेतीपूरक साहित्यावर चोरट्यांचा मोठा डोळा आहे. या शिवारातून एकदाच ४० मोटर पंप चोरीला गेले. शेतकऱ्यांच्या तुषार व ठिबक सिंचनाच्या पितळी तोट्या चोरून नेण्यात आल्या. सिंचन पाईप ची चोरी करण्यात आली. विज उपकरणातील स्टार्टर, वायर चोरून नेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. याबाबतीत अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांना चोरटे गावले नाहीत. या चोरट्यांमध्ये दारूडे तसेच भंगारवाले सहभागी आहेत, असा संशय व्यक्त करून पोलीस पाटील रामराव काळे यांनी चोरट्यांचा छडा लावून शेतकऱ्यांना चिंता चक्रातून मुक्त करावे व हा प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

सेवादासनगरातील माझ्या शेतीतून सिंचनाचे दहा पाईप व तुषार संचाचे २४ नोझल दोन महिन्यापूर्वी चोरीला गेले. त्याची पोलिसात तक्रार दिली. चोरटे अजूनही गवसले नाही. ऐनवेळी या चोरीमुळे मला भुईमूग लागवड करता आली नाही. शेत पडिक पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीचे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी ? कशासाठी शेती करावी, अशी मानसिकता बनली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून चोरट्यांना इंगा दाखवावा व त्यांच्या त्रासातून मुक्तता करावी.

– सुनील मांगीलाल राठोड

शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य पार्डी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close