खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमिनीच्या वादावरून शेतातील पिकांची नासधूस; आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल

पुसद:: खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्तलुक्यातील रोहडा येथे राहणाऱ्या तिघांनी संगणमत करून शेत जमिनीच्या कारणावरून पिकात पाळी करून नासधूस केल्याची धक्कादायक बाब दि.९ जून २०२४ रोजीच्या सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली आहे.पिकांच्या नासधुसीला कारणीभूत ठरलेल्या तिघांना विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये चौकशी अंती व पंचनामा केल्यानंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे.बेबी संजय कांबळे वय ४७ वर्षे रा.रोहडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातच राहणाऱ्या रमेश सूर्यभान राठोड,गजानन आडे व यशोदा मदन आडे यांच्या विरोधात दि.२७ जून २०२४ रोजीच्या रात्री ९.२२ वाजता गुन्हे दाखल झाले आहे. प्राप्त माहितीनुसार बेबी कांबळे ह्या मुंबई येथील कोपरखैरणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांची रोहडा येथील शेत सर्वे नंबर ४३ मधील दोन हेक्टर ४३ आर क्षेत्रफळ वहिवाट नुसार शेत जमीन आहे.ती शेत जमीन बेबी कांबळे यांनी सन १९९७ रोजी ९९ वर्षाच्या करारावर राजीखुशीने लिहून घेतली होती. त्याचा योग्य मोबदला देखील देऊन त्याच वेळी सदरची जमीन बेबी यांनी ताब्यात घेतली होती. वहिवाटानुसार शेत जमीन ताब्यात असतांना जातीय द्वेष भावनेतून तिघांनी संगणमत करून गेल्या महिन्यात विहीर बुजविली.बेबी यांच्या शेतातील पिकांना मिळणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण केला.याशिवाय बेबी यांच्या ताब्यात असलेल्या शेतातील दहा ते बारा सागाची झाडे तोडली.वहिवाट्यातील शेती पाहणारे नामादेव राठोड यांनी बेबी कांबळे यांना फोनद्वारे सर्व हकिकत सांगितली.बेबी ह्या मुंबईला असताना त्यांनी सदरच्या बाबींकडे दुर्लक्ष केले होते.त्या शेत जमिनीत दि.९ जून २०२४ रोजी उडीद व नंतर कापूस पेरले होते.त्यानंतर तिघांनी संगणमत करून जातीय द्वेष भावनेतून जमिनीत पेरणी केल्यानंतर त्यात पाळी करुन कापूस व उडीद पिकांची नासधूस केली. प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून केल्या जात आहे.



