डीजे, मद्यप्राशन विरहित उत्सवासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा-पोलीस उपअधीक्षक पंकज अतुलकर ◆भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण!

पुसद :गणेशोत्सवात सहभागी मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून शहरातील उत्सवांचे गतवैभव पुनर्प्रस्थापित करण्यासाठी पुसद अर्बन बँक तसेच भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला सांस्कृतिक वारसा जोपासणारा उपक्रम यशस्वी ठरला आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांतता व शिस्तीत पार पडली.यापुढे डीजे विरहित उत्सवासाठी युवक मंडळींनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पंकज अतुलकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. पोलीस उपअधीक्षक अतुलकर पुढे म्हणाले की, या उत्सव मिरवणुकीत घरातील ज्येष्ठ मंडळी सहभागी होतील, असे वातावरण तयार करावे. अवाढव्य मूर्त्यांची स्थापना करण्याऐवजी सीमित आकाराच्या छोट्या मूर्त्यांची स्थापना करावी, जेणेकरून आपण दहा दिवस ज्या श्रीच्या मूर्तीचे पूजन स्वहस्ते करतो, ती मूर्ती क्रेनएवजी मंडळातील युवकांच्याच हस्ते विसर्जित व्हावी, डीजे ऐवजी ढोल ताशांना प्राधान्य द्यावे, शक्य झाल्यास युवकांना ढोल ताशांचे प्रशिक्षण द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येणारा नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरातील गणेशोत्स-दुर्गा उत्सवादरम्यानचे उपक्रम, सीसीटीव्ही ,सिग्नल्ससाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी शरद मैंद यांचा विशेष गौरव केला. शहराच्या सामाजिक विकासात सातत्याने अग्रेसर असलेल्या भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गत दोन वर्षांपासून गणेश उत्सवादरम्यान उत्कृष्ट गणेश मूर्ती, शिस्तबद्ध मिरवणूक, उत्कृष्ठ सामाजिक उपक्रम, उत्कृष्ट सजावट स्पर्धा असे चतुर्थ गट विभागून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिला क्रमांक- २१ हजार, दुसरा क्रमांक १५ हजार व तृतीय क्रमांक ११ रुपये आशा आकर्षक बक्षिसाची रोख लयलूट विजेत्या मंडळांना प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. यावेळी शहरातील एकूण ६५ गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता हे विशेष..यावेळी व्यासपीठावर शहर पो.स्टे.चे पोनि उमेश बेसरकर, वसंतनगर पो.स्टे.चे पोनि प्रवीण नाचनकर, स्थानिक नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार, पुसद अर्बन बँकेचे तसेच तसेच भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर यांनी शिस्तबद्ध मिरवणुकीचे श्रेय शरद मैंद यांच्या सुबक संकल्पनेतील उपक्रमाला दिले. गणेश मंडळातील युवकांनी धार्मिक मिरवणुका या डीजे, मद्यप्राशनाशिवाय मिरवणूक काढावी,त्यासाठी मंडळांतील युवकांनी सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. 
शहर पो स्टे चे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी डीजेसाठी लक्षावधी रुपये खर्च करून मिरवणुकीत डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी गर्दी होते.भविष्यात डीजेसाठीही स्पर्धा ठेवावी काय, अशा उपरोधिक शब्दात त्यांनी टीका केली. पुढे नवरात्र आहे,यात महिलांची गर्दी होणार,त्यामुळे कुठलाही अपप्रकार घडणार नाही,यासाठी युवकांनी सतर्क रहावे,उत्सव शांतता व आनंदाने साजरे करावे,असे आवाहन त्यांनी केले.मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी आम्हा प्रशासनाचे तनावीत असलेले अर्धेअधिक काम शरद मैंद यांनी कमी केल्याचे स्तुतीवर्धक मत व्यक्त केले. भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांना प्रेरणा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली.सुरज डुबेवार यांनी या उपक्रमामुळे सामाजिक उपक्रमात वाढ होऊन तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असल्याचे सांगितले.
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद यांनी आपल्या प्रास्ताविकात आगामी काळात अधिकाधिक गणेश मंडळे या स्पर्धेत सहभागी होतील. शहरातील उत्सवांना पुन्हा नव्याने सांस्कृतिक वैभवाचे दिवस यावे,गणेश उत्सव पर्यावरण पूरक व्हावा, हा स्पर्धे मागील हेतू सांगत त्यांनी भविष्यात डीजे विरहित गणेश विसर्जन मिरवणूक होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची मिरवणूक आम्ही डीजे विरहितंच पार पाडतो. त्याचाच आदर्श घेत गणपती व दुर्गाउत्सव मिरवणूक सुध्दा डीजे विरहित होण्यासाठी आपण प्रयत्नशील आसल्याचे यावेळी मैंद यांनी सांगिताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला.
यावेळी स्पर्धेतील विजयी गणेश मंडळांना मानचिन्ह, प्रशस्तीपत्र ,पुष्पगुच्छ व एक लाख ८५हजार रुपयांची रोख बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. निवड समिती प्रमुख ललित सेता, समिती सदस्य प्रा. दिनकर गुल्हाने,गजानन मोगरे,कौस्तुभ धुमाळे,स्वप्निल चिंतामणी,निलेश राजुलवार यांना प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मनीष अनंतवार यांनी केले. ◆
स्पर्धेच्या ‘उत्कृष्ट मूर्ती’ या प्रथम गटामधून प्रथम पारितोषिक चिंतामणी गणेश मंडळ गोविंद नगर, द्वितीय पारितोषिक जय भवानी गणेश मंडळ, सुभाष वार्ड, तृतीय पारितोषिक श्रीराम गणेश मंडळ, नवीन पुसद यांनी पटकावले तर द्वितीय ‘शिस्तबद्ध मिरवणूक’ या गटामधूनयुवा जल्लोष गणेश मंडळ यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, गणबादेव गणेश मंडळास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अभियांत्रिकी गणेश मंडळास देण्यात आले. स्पर्धेच्या ‘उत्कृष्ट सामाजिक उपक्रम’ या तृतीय गटामधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आझाद विशाल गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक ओम साई गणेश मंडळ तर तृतीय पारितोषिक भगवा रक्षक गणेश मंडळ, वसंत नगर यांना बहाल करण्यात आले. तर स्पर्धेच्या ‘उत्कृष्ट सजावट’ या चतुर्थ गटामधून प्रथम पारितोषिक ओंकारेश्वर गणेश मंडळास तर द्वितीय पारितोषिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पेसा गणेश मंडळास प्रदान करण्यात आले.
◆ मूर्ती विटंबना व नदी प्रदूषण रोखण्यात भारती मैंद पतसंस्थेचा सिंहचा वाटा!
अवाढव्य गणेश मुर्त्या विसर्जित करतेवेळी पुसनदीच्या पुलावरून तसेच नदी तिरावरून उचलून निष्काळजीपणे फेकल्या जात होत्या.त्या सुव्यवस्थित, अस्थादायक पद्धतीने नदीपात्रात विसर्जित करण्यासाठी शरद मैंद यांनी भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांअंतर्गत दोन जादा क्षमतेच्या क्रेन मशीन प्रशासनास उपलब्ध करून दिल्या परिणामी गणेश मूर्त्यांचे होणारे विटंबन थांबले. तसेच १० दिवस गणेशास पुजलेले निर्माल्य बेल,फुले नदीपात्रात न टाकन्यासाठी चार निर्माल्य कलशाची तात्पुरती उभारणी केली होती यामुळे नदी पात्रातील पाण्याचे होणारे प्रदूषणही थांबविता येते.



