वालतूर रेल्वे शेत शिवारात काळ्यारानात वाणूचे आक्रमण: कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याची गरज

पुसद:यंदा पावसाचे आगमन वेळेपूर्वी होणार म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होते. सर्वकाही वेळेनुसार झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि खताची देखील खरेदी केली. मात्र, ज्याच्यावर संपूर्ण खरीप हंगाम अवलंबून आहे तो मान्सूनच अजून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे केवळ शेती क्षेत्राशी निगडीत असणारेच चिंतेत असे नाही तर सर्वच बाबींवर त्याचा परिणाम झाला आहे.यंदा मान्सूनच्या पावसाच्या आगमणाची वाट पाहात असतांना अद्यापही दमदार पाऊस झाला नसला तरी काळ्यारानात पेरणीपूर्वीच ‘मिलीपीड’ अर्थात ‘वाणू’ या किटकाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकर्यांवर अस्मानी संकट उभे ठाकल्याने कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
परिसरातील वालतूर रेल्वे शिवारात मीलीपीड हे शास्रीय नाव असलेल्या व ग्रामीण भागात पैसा/वाणू ह्या बहुभक्षी किडचा गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रादूर्भाव दिसत असल्याने विशेष करुन अंकुरित सोयाबीन पिकांवर हल्ला करुन तसेच कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आणतात.त्यामुळे शेतकर्यांना बीज प्रक्रीया करुन दाट पेरणी करावी लागते व बियाण्यांचा खर्च वाढण्याबरोबरच पिकाची वाढ खुंटते.तसेच यापासून बचावासाठी शेतकरी थिमेंटचा वापर करत असले, तरी त्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.अनेक शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने खराब झालेली तूर,सोयाबीन,चना आदींचा कुट करुन त्यामध्ये किटकनाशक टाकून सर्व शेतात शिंपडून उपाययोजना करीत असले तरी दरवर्षी वाणू वाढतच आहेत.गत तीन वर्षांपासून विविध संकटांशी सामना करणारा शेतकरी यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच काळ्या रानात वाणूंचे आक्रमण वाढल्याने त्रस्त झाले आहेत.वाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांना मजूर लावून वाणू वेचून काढण्याचे काम करावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र वाणूंचा नायनाट करण्यासाठी ठोस सल्ला व उपाययोजनांबाबत बहुतांश शेतकर्यांना माहिती नसल्याने दरवर्षी पिकांचे नुकसान वाढत आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात रिमझिम पाऊस झाल्यामुळे त्यांचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल आले आहेत.
विमा कंपणीव्दारे काढण्यात येणार्या पीक विम्यामध्ये ह्या अस्मानी संकटाचाही समावेश करावी अशी मागणी सागर पाटील या शेतकर्याने केली आहे.
कृषी विभागाने पेरणीपूर्वीच गावो-गावी जाऊन वाणू या किटकांच्या वाढीची कारणे,त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यासाठी कृषी मेळावे घेऊन जनजागृती करावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात गरजेचे येत आहे.
‘वाणू’ या बहुभक्षी कीडीचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणीसाठी कृषी मंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक यांना पाठवून शेतकर्यांना मार्गदर्शन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– शुभम बेरड
तालुका कृषी अधिकारी,पुसद



