हिवळणी परिसरातील शेतीचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान तात्काळ मदत द्या – संजय आडे

पुसद: शुक्रवारी मध्यरात्रीपासून तालुक्यातील माळपठारावरील हिवलणी परिसरातील अनेक गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. माळपठारावरील हिवळणी परिसरात शुक्रवारपासून सतत धार पावसाला सुरुवात झाली ती आज शनिवारीही सुरूच होती. हिवळणी, पिंपळगाव आमटी, कुंभारी, फेट्रा आडगाव, खेरखेडा, मोप, होरकड, मारवाडी, रोहडा, बेलोरा, आदी ठिकाणी या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ओढा नाल्याला पूर आल्यामुळे व पावसाचा जोर वाढतच राहिल्यामुळे पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतीसह पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की पिकांबरोबर शेतजमिनी सुद्धा खरडून गेल्या. शेतातील मातीसुद्धा पाण्यात वाहून गेली. शुक्रवार दिनांक २१ जुलै रोजी रात्री पुसद तालुक्यातील माळपठारावरील हिवळणी, आडगाव, पिंपळगाव, आमटी, कुंभारी, फेट्रा खेरखेडा या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या अतिपावसाने पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतजमिनीची पिके ही खरडून गेली आहे. अशा भयंकर पावसामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदाच्या हंगामात मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून, कर्ज काढून उसनवारीने पैसे घेऊन शेतीत पेरणी केली. बी बियाणे टाकले. पिकांना खते दिली. पिकाची स्थिती उत्तम असतानाच शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांनी शासनाकडे केली आहे.



