ग्राम वाचनालय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी-रामदास बोढे

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : ग्राम वाचनालय, गणेशपूर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी असून वाचनालयाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर जाण्याचे आवाहन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रामदास बोढे यांनी केले.ग्राम वाचनालय वतीने वाचनालयाच्या अभ्यासीकेत अभ्यास करून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली पूजा रमेश जाधव, सहाय्यक अभियंता(जलसंपदा ) पदी निवड झालेली जयश्री विजय जांभुळकर, सनदी लेखापाल परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेली धनश्री विजय जांभुळकर या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवारांच्या हस्ते गौरवण्यात आले.विचारपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम वाचनालय ,गणेशपूरचे अध्यक्ष रामदास बोढे, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत गणेशपूरच्या सरपंचा सौ. आशाताई जुनगरी,सचिव मिलिंद माने, जेष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम इद्दे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानदा स्पर्धा परीक्षा अकादमी, वणीचे संचालक वैभव ठाकरे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुणे ,मुंबई येथेच जाण्याची आवश्यकता नसून सर्व सोईंनी युक्त ग्राम वाचनालय ,गणेशपूर सक्षम असल्याचे मत मार्गदर्शक वैभव ठाकरे यांनी व्यक्त केले.वाचनालयाला स्वतःची इमारत नसून लवकरच स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन सरपंचा सौ. आशाताई जुनगरी यांनी दिले. वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार हे सदैव वाचनालयाच्या प्रगतीसाठी मदत करत असल्याचा विशेष उल्लेख याप्रसंगी करण्यात आला.अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालणारी पूजा जाधवने आपली आई, ग्रामवाचनालय, नातेवाईक,मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे सचिव संदीप डहाके, उपसचिव प्रवीण ठेंगणे यांनी, प्रास्ताविक उपाध्यक्ष संदीप ठाकरे यांनी तर आभार कोषाध्यक्ष जगदीश ठावरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वाचनालयाचे माजी सचिव गणेश लोहे सर, सौरभ बोढे, मधुकर कोडापे, , वासुदेव ठाकरे, उमेश बलकी, सुभाष खंडाळकर,सुरज मुके,ग्रंथपाल छाया लिचोडे यांनी परिश्रम घेतले.