विद्यार्थ्यांनी ज्ञानसमृद्धीसाठी वृत्तपत्रे नियमित वाचावी प्रा. दिनकर गुल्हाने
गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयात वाचन प्रकल्प पंधरवडा समारोप

पुसद:वाचन संस्कृती वाढावी, त्यातून जीवन समृद्धी येईल. नव्या पिढीने ही वाचन संस्कृती आत्मसात करावी. समर्थपणे पुढे न्यावी. ‘वाचाल तर वाचाल’, हे तथ्य लक्षात ठेवावे, असा विचार वाचन संकल्प पंधरवडा कार्यक्रमात साहित्यिक, लेखक, पत्रकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयात वाचन पंधरवड्याचा समारोप ता.१५ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र देशमुख होते.
या समारोप सोहळ्यात फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. पी.पी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने, पत्रकार शेख हमीद शेख चांद, पुसद नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ब्रँड ॲम्बेसिडर प्रा. डॉ. स्वाती दळवी-वाठ यांचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी ग्रंथपाल विजय राठोड यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या वाचन प्रकल्प पंधरवड्यातील विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला. सुरुवातीला ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
डॉ. पी.पी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त ग्रंथ,चरित्र,पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. वाचनातून ज्ञानात भर पडते. त्यातून आपले करिअर घडू शकते, स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भ ग्रंथ वाचावे. अलीकडे डिजिटल लायब्ररी उपलब्ध झाली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, असे ते म्हणाले. प्रा. दिनकर गुल्हाने यांनी पत्रकार हा प्रथम वाचक असावा. वाचनातून लेखनाला नवा आयाम
मिळतो. नवी उर्मी मिळते, असे सांगितले. भाषा व ज्ञान समृद्धीसाठी, नव्या जगताची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रे नियमित वाचावी, असा सल्लाही त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. भालचंद्र देशमुख यांनी महाविद्यालयात उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ व ग्रंथसंपदा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी नियमितपणे वाचन करावे. वाचन पंधरवडा संपला तरी वाचनाची सवय यापुढे कायम जपावी, या शब्दात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राखी इंगळे यांनी केले. प्रा. धनंजय कोठाळे यांनी आभार मानले.
वाचन पंधरवड्यात कार्यक्रमांची रेलचेल
महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयात उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्रंथालय स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शनी, वाचन कौशल्य कार्यशाळा, सामाजिक कार्यावरील वृत्तपत्रांच्या कात्रणांचा संग्रह, सामाजिक समस्यांवर जिल्हा व सत्र न्यायाधीश नीता मखरे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती जाधव यांचे मार्गदर्शन, ‘आधुनिक काळात ई-बुक जर्नल वेबसाईटचे महत्व’ या विषयावरील उद्बोधन, ग्रंथालय प्रशिक्षण, ग्रंथालय भेट, लेखक- विद्यार्थी वाचन संवाद, कार्ला देव येथील शाळेत आयोजित ग्रंथालय दारी उपक्रम, वाचन कौशल्य मार्गदर्शन, सोल सॉफ्टवेअर बद्दल चर्चा, उत्तर परीक्षण व कथन, ‘वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालयाची भूमिका’या विषयावर परिचर्चा, ‘वाचन संस्कृती : काल आज आणि उद्या’यावर निबंध स्पर्धा अशा वाचन संस्कृतीला परिपोष करणाऱ्या उपक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली.
मकर संक्रांतीला पुस्तकाचे वाण !
या पंधरवड्यातील मकर संक्रांतीला अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थिनींना पुस्तकाचे वाण भेट देण्यात आले. यावेळी प्रा. संध्या कदम, पाहुण्या श्रीमती रोहडकर, अंगणवाडी सुपरवायझर सौ. पाचपुते, डॉ. राखी इंगळे, डॉ. अर्चना पडगिलवार, प्रा. बबीता रत्नपारखी, शबाना मॅडम उपस्थित होत्या.



