पुसद शहरांसह तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी कुठं होतोय खेळ? भेसळयुक्त दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

पुसद: शहरासह तालुक्यात पाकीटाव्दारे व खुल्ले भेसळयुक्त दुधाची विक्री सर्रासपणे सुरूआहे. भेसळखोरांकडून शहरातील अनेक दूध संकलन केंद्रामार्फत भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे परंतु या भेसळुक्त दूध पुरवठ्याकडे अन्न व औषध विभागाच्या कर्मचाऱी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व फार मोठे आहे. दुधाला अमृततुल्य समजले जाते. मात्र काही तालुक्यातील दूध केंद्र संकलन चालक विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी व व्यवसायीक अधिक नफा मिळविण्याच्या लालसेमुळे दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकारावर आळा बसावा, जनतेला चांगले दुध मिळावे या उद्देशाने दुधात होणार्या भेसळविरुध्द कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय सुद्धा निर्गमीत करण्यात आला होता. मात्र अन्न व औषध प्रशासनाने या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.दुधात भेसळ करणार्यांविरुध्द कठोर कार्यवाही करण्याची गरज असतांना मात्र अन्न व औषध प्रशासन, भेसळयुक्त दूध विक्रेत्यांना पाठीशी घालत आहे.शहरात अनेक भागात मालकीच्या किंवा भाड्याच्या जागेत दूध संकलन केंद्र सुरू आहेत. दररोज सकाळ संध्याकाळ दूध उत्पादक स्वत: दुध पुरवठा करतात परंतु अनेक ठिकाणी या दुध संकलन केंद्रात दुधात भेसळ केली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दूध संकलन केंद्र चालक अधिक पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी दुधामध्ये युरिया, डिटर्जंट, पाम ऑइल, कॉस्टिक सोडा, बोरिक ॲसिड, आधी पदार्थांचा सर्रासपणे वापर करीत आहेत सिंथेटिक भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात आहेत. भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुधातील भेसळीमुळे अनेक जीवघेणे आजार जडण्याची दाट शक्यता बळावते त्यामध्ये पोटाचे विकार, उलट्या, जुलाब, ॲलर्जी, किडनी, हृदयाचे आजार, प्रतिकारशक्ती कमी होणे, कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या असे कृत्रिम, भेसळयुक्त दूध उत्पादनात गुंतलेल्या व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापा टाकून दुधाचे नमुने तसेच पिशवीतील दुधाचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घ्यावे व सखोल चौकशी करून तालुका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तिकरित्या कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.



