समस्यांचा ध्यास घेऊन चिरस्थायी पत्रकारिता करावी अविनाश दुधे : पुसद पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार!

पुसद : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारापेक्षा समाज सुधारक अधिक होते. पत्रकारिता हे त्यांचे समाज सुधारण्याचे साधन होते त्यांच्या पंगतीतील पत्रकार म्हणून आजच्या पत्रकारांनी मिरवणे योग्य नाही. अलीकडे पत्रकारीता हा धंदा झाल्याने मूल्य व निष्ठा जपणाऱ्या पत्रकारांची गोची होत आहे. पत्रकारितेची वाटचाल खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत आपले वेगळेपण जपण्यासाठी समाजातील समस्यांचा ध्यास घेऊन पत्रकारांनी चिरस्थायी पत्रकारिता करावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी केले.पुसद पत्रकार संघातर्फे मंगळवार ता.६ रोजी देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे (संपादक, जनमाध्यम अमरावती), ‘मीडिया वॉच’ चे संपादक अविनाश दुधे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक होत्या. त्यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित सेता, सचिव हरिप्रसाद विश्वकर्मा, माजी अध्यक्ष प्रा. दिनकर गुल्हाने, रवी देशपांडे, अखिलेश अग्रवाल, अनिल चेंडकाळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविक हरिप्रसाद विश्वकर्मा यांनी केले. पुसद पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कारमूर्ती पत्रकारांचा परिचय प्रा. दिनकर गुल्हाने यांनी करून दिला. पत्रकार संघाचे सदस्य कैलास जगताप, राजू दुधे, ज्ञानेश्वर शिंदे, रूपेंद्र अग्रवाल, गणेश राठोड, योगेश राजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राजे यांनी केले.आजच्या पत्रकारिता क्षेत्रातील वास्तव स्थितीवर अविनाश दुधे यांनी कोरडे ओढले. पत्रकारिता हा धंदा झाल्याने पैसा उपसण्यासाठी मूल्य जपणाऱ्या संपादकांवर दडपण आणल्या जाते. जोपर्यंत मालकाच्या हितसंबंधाला धक्का पोहोचत नाही, तोपर्यंत पत्रकार काम करू शकतो. त्यामुळे निष्ठा आणि मूल्यांना या क्षेत्रात आता फारशी किंमत राहिली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या किंवा कुपोषण यासारख्या महत्त्वाच्या बातम्यांना जागा देण्यापेक्षा महसूल महत्त्वाचा वाटतो, तेव्हा संपादकाचे अवमूल्यन होते, याचे त्यांनी उदाहरणासह विवेचन केले. पत्रकारिता हे सतीचे वाण असल्याची कल्पना आजच्या काळात निखालस खोटी असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तुमच्या हाती लेखणी आहे, एवढेच काम करा, एखादा प्रश्न सोडवून कायमचा ठसा उमटवा, अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांकडून केली.सोशल मीडिया बद्दल बोलताना अविनाश दुधे म्हणाले की, सोशल मीडिया मानवी मेंदूला गुलाम करते. यातील पत्रकारिता ही विचित्र चक्र असून वाचकांना सापळ्यात अडकवल्या जाते. आकर्षक शीर्षक देऊन ते ‘क्लिक ‘ करण्यास उद्युक्त केल्या जाते. त्यातून ‘हिट’ ची गणना होते आणि जाहिरातीतून त्यांचा महसूल वाढतो. यातून मूल्य जोपासणाऱ्या संपादकांची अवहेलना होत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
प्रिंट मीडियाची विश्वासार्हता वाढत आहे
: प्रदीप देशपांडे…
अलीकडच्या काळात ऑफसेट, वेब ऑफसेट यापुढे मीडियात तांत्रिक प्रगती झाली आहे. पत्रकारितेची गती वाढली आहे .मात्र विश्वासार्हता गमावली आहे. सोशल मीडिया पेक्षा लोक वृत्तपत्रात काय छापून येते यावर जास्त विश्वास ठेवतात. तीन व चार वर्षाच्या कालावधीत प्रिंट मीडियाची विश्वासार्हता वाढत आहे. वाचकांचा कल वैचारिक लेखनावर पुन्हा वाढेल अशी अपेक्षा ज्येष्ठ संपादक प्रदीप देशपांडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणातून नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी पत्रकारांचा गौरव केला. पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांनी पत्रकारांनी योग्य ठिकाणी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार संघाचे पत्रकार भवन उभारण्यासाठी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली जाधव , अश्विनी जिल्हेवार, जयश्री दुधे, नगरसेवक दीपक काळे , शिवाजी खडसे,माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने, विनोद जिल्हेवार, राजन मुखरे, उमाकांत पापिनवार, प्राचार्य गणेश पाटील, अनिल उत्तरवार, शरद बजाज, सुरेश धनवे, ज्ञानेश्वर अजमिरे यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.



