राष्ट्रसंतांनी भारतीय समाजाला दिशा दिली-खासदार संजय देशमुख
पुसद येथे ग्रामजयंती सोहळा उत्साहात;गुरुदेव भूषण व प्रार्थना प्रेमी पुरस्काराचे थाटात वितरण

पुसद : ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भारतीय समाजाला योग्य दिशा दिली असल्याचे प्रतिपादन खासदार संजय देशमुख यांनी येथे केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखेतर्फे येथील देशमुखनगरमधील जिजामाता चौकातील मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी आयोजित मानवतेचे महान पुजारी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११६ वी जयंती अर्थात ग्रामजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय देशमुख बोलत होते.
अध्यक्षस्थानी कृषिभूषण दीपक आसेगावकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस शरद मैंद, मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. यावेळी मंडळातर्फे राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या व्यक्तीला मागील आठ वर्षांपासून दरवर्षी देण्यात येणारा, मानाचा‘श्री गुरुदेव भूषण पुरस्कार – २०२५’ यंदा प्रमोद देशमुख (रा. सवना ता. महागाव) यांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व ग्रामगीता हे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच मंडळातर्फे दर गुरुवारी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेला वर्षभरात जास्तीत जास्त वेळा उपस्थित राहणाऱ्या मंडळाच्या महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे व श्रीमती चंदाताई गोडसे यांना यंदाचा ‘प्रार्थना प्रेमी पुरस्कार -२०२५’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंडळातर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे खासदार संजय देशमुख यांनी कौतुक करून भविष्यात गुरुदेव सेवा मंडळाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख अतिथी शरद मैंद यांनी राष्ट्रसंतांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे डोळस विचार समाजात रुजवित असल्याबद्दल गुरुदेव सेवा मंडळाची प्रशंसा करून आजच्या काळात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बुवा बाबांचे पेव फुटल्याबद्दल त्यांनी शेवटी चिंता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून ‘आई ‘ कवितेचे सादरीकरण केले व उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ व साई भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रसंतांची खंजिरी भजने साग्रसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रस्ताविक मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे यांनी केले. संचालन मंडळाचे मध्यवर्ती प्रतिनिधी यशवंत देशमुख यांनी तर आभार कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे यांनी मानले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली व राष्ट्रवंदना सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. प्रकाश लामणे, प्रा नंदकुमार खैरे, सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज, उपाध्यक्ष नंदकुमार पंडित व मनोहर बनस्कर, सचिव ॲड गजानन साखरे, मार्गदर्शक रमेश सरागे, सहसचिव पांडुरंग बुरकुले व प्रमोद जयस्वाल, कोषाध्यक्ष सुरेश कदम, शरद राऊत, माधव जाधव, यशवंत देशमुख, अनिल अस्वार, विठ्ठलराव येवले, राजेंद्र काळबांडे, शिवशंकर नागरे, वसंत ढोणे, प्रा. शंकर दंडारे, वसंत काळीकर, राजू पुरी, पांडुरंग शिनगारे, गजानन कवाने, मारोती सरगर, डॉ अनिल भावसार, किसन गरडे, ज्ञानेश्वर सुरडकर, ज्ञानेश्वर ताकतोडे, गजानन जाधव, हर्ष सरडे, खुशाल लामणे, गजानन दाभाडे, प्रा नरेश राठोड, शिवलिंग पटवे, कैलास मस्के, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, चंदाताई गोडसे, मंगला पंडीत, इंदू राऊत, पूजालता देशमुख, सुवर्णमाला पुरी, संध्या पवार, माधुरी वांझाळ, शीला जाधव आदींनी पुढाकार घेतला. यावेळी पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेव प्रेमी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



