पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजीमंत्री मनोहरराव नाईक यांचा आदेश झुगारून१८ पैकी ८ संचालकांनी दिले राजीनामे!तर एका मताने सभापतीपदी शेख कौसर यांची निवड!

पुसद: कृषी उत्पन्न बाजार समिती अधिच डबघाईस आली असून या बाजार समितीचे सभापती अमोल फुके यांनी बंगल्यातून आलेल्या आदेशावरून राजीनामा दिल्याचे घोषित केले होते. तेव्हापासून सभापती पद रिक्त होते तर एकीकडे कर्मचाऱ्यांना तब्बल आठ महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. पगाराअभावी मुलांच्या शिक्षणासह आजारपण तसेच कौटुंबिक तसेच दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाले असून संयम सुटत चालेल्या या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणही थाटले होते. पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९२३ची असून जवळपास शंभर वर्षे जुनी ही बाजार समिती आहे तर ही बाजार समिती ‘अ’ वर्गात मोडते, परंतु या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभारामुळे ही बाजार समिती डबघाईस आली असून आता तर संचालकाच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल फुके यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी आज सभापती पदाची निवडणूक झाली. सभापती पदासाठी शेख कौसर यांना सभापती करण्यासाठी माजी मंत्री मनोहरराव नाईकांच्या आदेशाचे पत्र जिनिंग प्रेसिंग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विजयराव चव्हाण यांनी आणले आणि ते पत्र सभागृहात वाचून दाखविले. परंतु ऐन वेळी ॲड.छाया प्रशांत देशमुख यांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीला अभिजीत श्रीराम पवार हे गैरहजर राहिले.तर ९ संचालकांनी शेख कौसर यांना मतदान केले तर ८ संचालकांनी ॲड.छाया देशमुख यांना मते दिली. ९ विरुद्ध ८ असे मतदान झाले आणि एका मताने शेख कौसर विजयी झाले. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी ९ संचालकांनी आज सायंकाळी पदाचे राजीनामे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद यांच्याकडे दिले. कोरम पूर्ण होण्यास १० संचालकांची आवश्यकता असते,सबब सध्या ९ संचालक असल्याने कोरम पूर्ण होवू शकत नाही म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होवू शकते. त्यामुळे पुसदच्या सहकार क्षेत्रात नेत्याच्या आदेश झुगारण्याची ही पहिलीच घटना असून यावरून सध्या शहरातील राजकारणाचे चित्र कोणत्या दिशेला जात आहे. याची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.



