बियाणांचा तुटवडा भासवुन चढ्या दराने कपाशी बियाणांची विक्री: कृषी विभागाचे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष!

पुसद : शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर खरीप पेरणीसाठी बी-बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली असताना, कृषी सेवा केंद्रांना विशिष्ट बियाणे कंपन्यांची बियाणे मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी तर बियाणांची भावाच्या सव्वा चढ्या दराने खुलेआम विक्री सुरु असून, ८६० रुपयांची बॅग दीड ते दोन हजारांपर्यंत विक्री होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना बिल मात्र ८६० रुपयांचे दिले जात असल्याचे चित्र आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. याबाबत प्राप्त सुत्राची माहिती अशी की, शेतकऱ्यांसाठी मागचा हंगाम वाया गेला तसेच मागील दोन-तीन वर्षात तालुक्यासह जिल्ह्यात निकृष्ट उगवणक्षमता, बोगस बियाणे यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचा अनुभवामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे. पूर्वी फक्त तालुक्याच्या ठिकाणीच विक्रेते होते. मात्र आता गावोगावी बियाणे विक्रेते झाल्याने शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. तालुक्यात जवळपास अंदाजे १०५ कृषी सेवा केंद्र आहेत.खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध असल्याचे कृषी विभाग नुस्ता गवगवा करीत आहे.मात्र, प्रत्यक्षात बियाणे उत्पादक कंपन्यांकडे नोंदविलेल्या मागणीच्या प्रमाणात काही टक्के बियाणांचा पुरवठा कंपन्यांनी पुरवठा केल्याची माहिती कृषी सेवा केंद्राकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.तर शेतकरी काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला पसंती देत असल्याने कृषी सेवा केंद्रचालका कडून जाणीवपूर्वक तुटवडा भासवुन या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी काळ्या बाजारात वाढविले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.बाजारात कबड्डी,राशी ६५९,जादू, ६३९श्रिराम,सुपरकॉट,यासह अन्य कंपन्यांचे बियाणे तसेच पिडीएम पोट्यास,१५०/-रुयाची बॅग, १०००/- रुपयाने विक्री केली जात आहे तर १८×१८×१०, बॅग ४०० /- रुपयाची बॅग १०००/- रुपये चढ्या दराने खुलेआम विक्री केली जात आसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.एकीकडे विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या माथी दुसरे कंपनी चे बियाणे विक्री करून दिले जात आहे. इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाहीं परंतु या प्रकाराकडे कृषी विभागाचे कृषी अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष असल्याने या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने कृषी विभागाने बोगस बियाणे,अव्वाच्या सव्वा भावात विक्री,बियाणे चा कृत्रिम तुटवडा यासाठी पथके कार्यरत आहेत मात्र ही पथके नावालाच असल्याचे दिसून येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. बियाणे उपलब्ध नाही कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना हव्या असलेल्या बियाणासोबत इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही–संजय ठाकरे शेतकरी येंरांडा,
“आधीच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. त्यात आता खरीप हंगाम यावर्षी यशस्वी होणार असल्याचे भाकीत वर्तविल्याने शेतकऱ्यांची बियाणे मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे.कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची तुफान गर्दी आहे. शेतकरी मिळेल त्या मार्गाने त्या किमतीत बियाणे खरीदी करीत आहेत. त्यामुळे कृषी केंद्र चालक कपाशीच्या बियाणाचे दुप्पट भाव सांगत आहेत, तर काही ठिकाणी बियाणे शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहेत. शेतकऱ्याला हवे असलेली बियाणे मिळेनासे झाले आहे. मिळालेच तर एक बँगसाठी आवाचेसव्वा रुपये मोजावे लागत आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी पथके धृतराष्ट्राचे सोंग घेत आहेत- संभाजी टेटर शेतकरी वरुड,
“पुसद तालुक्यात कृषी केंद्र चालकांकडून बियाणांचा तुटवडा भासवुन बियाणांचा नावावर शेतकऱ्यांकडून आवाच्या सव्वा पैसे उकळून लूट करीत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. परंतु ही शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार नाहीत त्या ठिकाणी कृषी विभागाचे उपविभाग व तालुका कृषी कार्यालय असून तरीही या अधिकाऱ्यासोबत शेतकऱ्यांची लूट सुरू असताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या आमदारांनी एकदाही आढावा घेतली असल्याचे ऐकिव नाही या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांबद्दल कुठलीही असता नाही.. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शेतकऱ्याला जर चढ्या भावाने बियाणाची खरेदी करावी लागत असेल तर स्थानिक आमदारांच हे अपयश आहे.–मनीष जाधव शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना



