विधायक कार्यासाठी तरुणांचे रक्त सळसळावे! डाॅ.विवेक सिरस्कार : नाईक अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन!

पुसद : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानवता धर्म,श्रमसंस्कार वृद्धिंगत होण्याबरोबर त्यांनी समाजाभिमूख होऊन नागरिकांच्या समस्यांची जाणीव करुन घेऊन त्यावरील उपाययोजना शोधून विधायक कामासाठी युवकांचे रक्त सळसळले पाहिजे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना शासन व समाजातील मुख्य दूवा आहे असे प्रतिपादन प्रा.डाॅ.विवेक सिरस्कार यांनी केले.
ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे दत्तक ग्राम वडसद तांडा येथे आयोजित विशेष शिबिराचे गुरुवारी(ता.१४) उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे होते. व्यासपीठावर सरपंच सुषमा राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत जामगडे,शिक्षक एस.ए. राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत, प्रा.प्रणय चव्हाण,प्रा.शितल चव्हाण,प्रा.भावना भावसार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी शिबिरार्थींनी राष्ट्रीय सेवा योजनेची प्रार्थना सादर केली. ता.१४ते २०पर्यंत आयोजित शिबिरासाठी शाळेचा परिसर उपलब्ध करून दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे विचार अंगीकारण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. वानखडे यांनी शिबिरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरी यामुळे अनेक सामाजिक समस्या सोडवण्याची संधी मिळते.विद्यार्थ्यांनी केवळ शिबिरापुरते काम न करता वडसद तांडा गावाला महिण्यातून एक दिवस भेट देऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहावे असे आवाहन केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भोलेनाथ कांबळे, शशिकांत जामगडे,एस.ए. राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भागवत यांनी केले. सूत्रसंचालन पायल शिरभाते व मधुरा पांडे यांनी केले.उपस्थितांचे आभार श्रेया सुरोशे ने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे विद्यार्थी प्रमुख ओम राहूडकर,आयुषी प्रतापवार व शिबिरार्थी विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.



