शिळे अन्न खाल्याने५५ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; श्री. गिरधारी महाराज विजाभज आश्रम शाळा हुडी बु. येथील धक्कादायक घटना!

पुसद: तालुक्यातील हूडी बु.येथील श्री.गिरधारी महाराज विजाभज आश्रम शाळांमध्ये रात्रीचे शिळे अन्न निवासी विद्यार्थ्यांना खाऊ घातल्याने या जेवणातुन ५५ते६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजण घटना घडली असून यातील एक विद्यार्थी खाजगी रुग्णालयात अतिदक्षता (आयसियु) विभागात भरती असून १२ विद्यार्थ्यांवर दक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद शहरापासून जवळच असलेल्या हूडी बु.येथील श्री.गिरधारी महाराज विजाभज आश्रम शाळांमध्ये दि.४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास निवासी विद्यार्थ्यांना रात्रीचे शिल्लक अन्न पुन्हा गरम करून जेवण खावु घातल्याने या सर्व विद्यार्थ्यांना पोटदुखी सुरु झाली. मळमळ होवून काहींना उलट्या व जुलाब होवू लागले. अशी लक्षणे दिसणाऱ्यांची संख्या वाढल्याने शाळेत घबराटीचे वातावरण पसरले विद्यार्थ्यांना हा त्रास सुरू झाल्याने रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांना तातडीने पुसद येथील तिन खाजगी रुग्णालयात जवळपास ४२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना मिळतात पोलिसांनी सुद्धा गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस सुरू केली असता सदर निवासी वस्तीगृहात २७५ विद्यार्थी राहत होते त्यापैकी जवळपास १५० विद्यार्थ्यांना रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून दिले त्यापैकी ५५ ते ६० विद्यार्थ्यांच्या परिस्थिती अचानक गंभीर झाल्याचे सांगितले.
हा प्रकार अन्नातून विषबाधेचा प्रकार लक्षात येतात सर्वांचीच तारांबळ उडाली. तर सदर घटनेची गंभिर दखल तहसिल प्रशासनाने घेवून आश्रमशाळा गाठली आहे. सदर घटनेचा अधिक तपास तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन करीत असून या घटने संदर्भात हलगर्जी करणाऱ्या शाळा प्रशासन व कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी केली असून जर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



