सक्सेसफुल पॅरेंटिंग कार्यशाळेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचे आयोजन
पाल्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी

पुसद: शहरातील नामांकित शाळा विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल आणि अमरावती येथील ट्रेन ओ ब्रेन या संस्थेद्वारे पालकांसाठी एक दिवसीय सक्सेसफुल पॅरेंटिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमानाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे मन आकर्षित करून घेतले. श्री पाटील सर आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत पर गीत सादर केले तसेच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.
व्यासपीठावर अमरावती येथील इंटरनॅशनल ब्रेनॉलॉजिस्ट व कौन्सिलर अखिलेश बैतुले, देश के मेंटॉर, मोटिवेशनल स्पीकर संदीप मुर्तडकर, संस्थेचे अध्यक्ष शरद मैंद,सचिव सूरज डुबेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष मनिष अनंतवार,सहसचिव संगमनाथ सोमावार, प्राचार्य अनुपमा भट देशमुख, उपप्राचार्य प्रतिमा जाधव, प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका श्रीमती त्रिपाठी उपस्थित होत्या. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाबाबत पालकांसमोर निर्माण झालेल्या अनेक समस्यांचे निराकरण विविध उदाहरण दाखल्यांद्वारे तज्ञ मार्गदर्शकांनी केले.पालकांच्या काही दैनंदिन चुकीच्या जीवन पद्धतीमुळे जसे टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवण करणे, सकाळी उशिरा उठणे, नियमित व्यायाम न करणे, मोबाईलचा अतिवापर करणे, घरच्यांसोबत अधिक वेळ न घालविणे, घरी आपापसात भांडण करणे या आणि अशा अनेक सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक विकासावर कसे वाईट परिणाम होत आहेत हे समजावून सांगण्यात आले. आपले मुल म्हणजे हे देवाने आपल्याला दिलेले एक चांगले गिफ्ट आहे, आणि ते अधिकाधिक चांगले करणे हे आपल्याच हाती आहे हे पालकांना समजले आणि आपल्या पाल्याच्या सर्वांगीन विकासासाठी आपण कसे जबाबदार आहोत हेही त्यांच्या लक्षात आले.यासोबतच शाळेमध्ये विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना जीनियस कसे बनवले जाईल आणि त्यासाठी कोणकोणते उपक्रम शाळेत राबवले जाणार आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेसाठी हजारोंच्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यशाळेत करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते आणि या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले.