स्नेहभोजनाची एक पंगत अन् संस्काराचे रंग गहिरे जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील अविस्मरणीय उपक्रम!

पुसद : शाळा म्हणजे केवळ अभ्यासक्रम व परीक्षा नव्हे, तर ती जीवनमूल्यांची, संस्कारांची आणि सहअस्तित्वाची प्रयोगशाळा असते, याची प्रचिती जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजन उपक्रमातून आली.विद्यार्थ्यांचे स्नेहभोजन हे केवळ एक जेवण न राहता, जीवनमूल्यांची एक जिवंत अनुभूती ठरली.
गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहे. बुधवार (ता.४) रोजी या सामूहिक सहभोजनाला विद्यार्थी आनंदाने आतुर झाले. शाळेतच रुचीदार स्वयंपाक तयार झाला. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ या मंगलमय श्लोकाने विद्यार्थ्यांच्या पंगतीला सुरुवात झाली. त्या श्लोकांच्या नादात परिसर भारावून गेला आणि मनात नकळत संस्कारांची रुजवण सुरू झाली. त्यानंतर शिस्तबद्ध रचलेल्या जेवणाच्या पंगतीत विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या शेजारी बसून भोजन घेतले. समानतेची भावना, हसरे चेहरे आणि आपुलकीचे नाते या पंगतीत प्रकर्षाने जाणवत होते.पंगतीत वाढण्यात आलेली चवदार वांग्याची भाजी, वरण-भात आणि लुसलुशीत गरम पोळी, जिभेवर गोडवा देणारी बुंदी हे केवळ जेवण नव्हते, तर घरच्या मायेचा, आईच्या हातची चव आठवण करून देणारा अनुभव होता. प्रत्येक घासात प्रेम अन् प्रत्येक क्षणात एकोप्याचा भाव दडलेला असल्याने पंगतीत गमतीजमतीला मजा आली. आनंदाचा गोडवा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहिला.
शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेत या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.यावेळी पुसद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमित बोजेवार, बी.आर.सी. कार्यालयातील विषयतज्ज्ञ दिलीप सारंगे, भारत शेरे, रामभाऊ रोगे, अनिता पावडे, लक्ष्मण वाघमारे, अविनाश तडसे, तसेच फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे प्रबंधक उमेश चव्हाण यांच्यासह यांच्यासह दिगंबर लोहटे, रूपसिंग आडे, गोकुळ राठोड, चंद्रशेखर कोडापे, रामभाऊ सोनुने, ढाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षक वृंदातील विजया कराळे, स्नेहलता पाचकोरे, भारती निगडकर, सोनाली राठोड, वर्षा इंगळे, सुनील चव्हाण, चिरमाडे, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली भालेकर, अनुराधा राठोड, संदीप वाघेला, नाना डोंगरे यांनीही विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.पुस्तकातील धडे कधी विसरले जातील, पण संस्कारांची ही पंगत विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराच्या आठवणींची शिदोरी ठरणारी ठरली.
शाळेतील या सहभोजन उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समता, सहभोजनाची संस्कृती आणि माणुसकीचे संस्कार रुजतात. अतिशय शिस्तीत आणि आनंदी वातावरणात हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
– अमित बोजेवार
विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पुसद



