शैक्षणिक

शालेय शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष;जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात कार्यक्रमांची रेलचेल!

पुसद:येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात शालेय शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले. ज्ञान, अध्यापन, विविध खेळ, गणित, शास्त्र, कला, अभिनय,नृत्य,पर्यावरण अशा विविधागी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगीभूत गुणांना चालना मिळाली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ता. २२ ते २८ जुलै पर्यंत चाललेल्या सप्ताहात शिक्षक विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना प्रतिसाद मिळाला. या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. या सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांच्या हस्ते ता. २२ रोजी झाले. पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्याने गाजला. विद्यार्थ्यांनी शब्दकोडी,शैक्षणिक कार्ड तयार केले. विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले. ता.२३ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी भाषिक खेळ, गणितीय खेळ सादर करण्यात आले. ता. २४ रोजी शालेय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, लंगडी, धावण्याची शर्यत आदी खेळात उत्साहाने सहभाग घेतला. ता. २५ रोजी सांस्कृतिक दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाने गाजला. पारंपारिक कला, पथनाट्य, नृत्य, विविध वेशभूषा यामुळे मुलांचे मनोरंजन तर झालेच शिवाय त्यांच्या ठायी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाला.

कौशल्यावर डिजिटल उपक्रम दिवस ता. २६ रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी पर्यावरण जागरूकता, पाणी वाचवा हे सांगतानाच विद्यार्थ्यांना संगणका विषयी माहिती देण्यात आली. ता. २७ रोजी शाळेत इको क्लब ची स्थापना करण्यात आली. याद्वारे पर्यावरण विषयक आवड निर्माण करणे, हा मुख्य हेतू आहे. यावेळी पर्यावरण रक्षणाची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तारीख 28 रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला. सप्ताहाची सांगता सहभोजनाने झाली. या सप्ताहाचे नियोजन मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांनी केले. पुसद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुशीला आवटे, फोपसे ताई, केंद्रप्रमुख मोहिते यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. शिक्षिका कराळे, सुनील चव्हाण, पाचकोरे, शारदा चव्हाण, कीर्तनकार, पंकज गावंडे, वर्षा इंगळे, गोकुळ राठोड, देविदास पांढरे, नाना डोंगरे, कांबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close