पुसद तालुक्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा !लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगमतामुळे जलजीवन योजनांच्या कामांना खीळ!

पुसद : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा शुभारंभ केला. तालुक्यात या योजनेतील कामांच्या दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजनांचा कार्यारंभ झाला असला तरी आजही अनेक गावातील कामे अपूर्ण आहेत. त्यातच जलजीवन मिशन कामांच्या नियमांची पायमल्ली करून निकृष्ट दर्जाची कामे कंत्राटदार , अधिकारी आणि लोक्रतिनिधी यांच्या संगनमताने झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत तालुक्यात माळ पठारावर व डोंगरदऱ्यामध्ये वसलेली गावे आहेत. उन्हाळ्यात अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उन्हाळा तोंडावर असतानाच आटत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यामुळे गेली अनेक वर्षात करोडो रुपयांच्या योजना पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवल्या गेल्या असल्या तरी टँकरमुक्त तालुका झालेला नाही. व अशा जलजीवन मिशनच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात देखील टँकरमुक्त तालुका होणार नाही अशी शक्यता अनेक गावातून निर्माण झाली आहे. जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे. परिणामी आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.पुसद तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावांमधून जलजीवन मिशन योजना राबवण्याचे शासनाने निश्चित करून जुन्या योजना कार्यान्वित करणे, नवीन योजना राबविणे, अशी कामे हातात घेतली आहेत. तालुक्यामध्ये जवळपास अनेक गावांमधून जलजीवन मिशन योजनेचे कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी काही गावात ही कामे पूर्ण झालेली आहेत. कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव, असून लोकप्रतिनिधी,कंत्राटदार आणि जी.प. पाणीपुरवठा इंजीनियर व अधिकारी यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यात या योजनेकरिता करोडो रुपयांची तरतूद करण्यात आलीआहे.या गावात यापूर्वीच्या योजनांचा विचार न करता सत्ताधारी लोकांच्या मर्जीनुसार या कामांचे वाटप झाले आहे. ज्या लोकांना पाईपलाईन बाबत अनुभव नाही अशा कंत्राटदारांना हि कामे देण्यात आली आहेत ज्या कंत्राटदाराला पाण्याचा टाकी बांधण्याचा कुठलाही अनुभव नाही अशा कंत्राटदारांना बांधकामाचे कामे देण्यात आली आहे .काही गावात तर यापूर्वी देखील लाखो रुपयांच्या योजना कार्यान्वयीत आहेत अशा गावात देखील करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. याबाबत अनेक गावात तक्रारी देखील झाल्या आहेत.मात्र, या तक्रारींना जिल्हा परिषदेच्या उपविभाग पाणीपुरवठा तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यवतमाळ या विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.तालुक्यात अनेक गावात वर्षानुवर्षे नवनवे प्रयोग करूनही काही गावातील पाणी टंचाई दूर झालेली नाही. यामुळे या गावात प्रतिवर्षी टँकरने पाणीपुरवठा करणे भाग पडत आहे. पुसद पंचायत समिती पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे. तर दुसरीकडे याच गावातून पाणी योजनांवर देखील खर्च टाकला जात आहे. शासनाने या योजनेकरिता मंजूर झालेली करोडोची रक्कम बघून कांही करून या योजना राबवायच्या या हेतूने पुसद पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने गावातील पाणी योजनांचा अभ्यास न करताच गावांचा समावेश करण्यात येत असतो तर अनेक गावात पाणी टचाई असताना सुद्धा फिल्टर मशीन बसविलेल्या आहेत .अनेक गावातून जलजीवन मिशन योजनेचे पाईप जमिनीतून वर काढलेले तसेच पडून आहेत. हे पाईप जोडण्यासाठी एका विशिष्ट मशीनची गरज असते. ही यंत्रणा कोणत्याही कंत्रागदाराकडे नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाईपलाईन जोडणी अद्याप तशीच खीतपत पडून आहे. नियमानुसार जमिनीच्या खालून जवळपास तीन फुट खाली खोदकाम करून पाईप लाईन टाकायची आहे मात्र, कंत्राटदारांनी पैसा वाचवण्यासाठी रस्त्याच्या वरून तर काही ठिकाणी अर्धा फुटापर्यंतच जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून पाईप टाकले आहेत. यामुळे भविष्यात रस्त्यावरून जाणारी वाहनांमुळे पाईपलाईनचे नुकसान होणार आहे. गावागावात बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या देखील निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, अधिकारी या योजनांच्या पाठपुराव्या बाबत दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कामे स्थानिक पुढाऱ्यांच्या नातेवाईकांनी किंवा जवळच्या कार्यकर्त्तयांनी घेतलेली असल्याने याबाबत कारवाई करण्यास अधिकाऱ्यांचे हात धजावत नाहीत. यामुळे या योजनेचे तीन तेरा वाजले असुन संपूर्ण योजनेचा बोजवारा उडाला आहे. तर या कामांना खिळ बसल्याने पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असून काही ठिकाणी पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी तरी जलजीवन मिशन योजनाचे पाणी चाखायला मिळेल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, बहुतांशी ठिकाणी कामे पूर्ण झालेली नसल्याने कंत्रादारांकडून वेळकाढूपणा काढला जात असल्याने त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित पाहणी केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या योजनेला संपूर्ण खिळ बसली आहे.



