मदत पुनर्वसनपुनर्वसन मंत्री व पालकमंत्र्यांची अनंतनगर येथे भेट!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम)राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी सकाळीच तालुक्यातील अनंतनगर येथी तांड्यात भेट दिली. यावेळी पूरग्रस्तांसह शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पंचनामे करताना भेदभाव करू नका,असे निर्देश यंत्रणेला दिले.
अतिवृष्टीमुळे वस्त्यांमध्ये तसेच नदी काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. शेतीचेही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सुक्ष्म आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले. महागाव तालुक्यात सतत दोन दिवस पावसाने थैमान घातल्याने प्रचंड नुकसान झाले.
घरे, शेती, शासकीय मालमत्तेची मोठी हानी झाली. आनंदनगरला पुराने वेढा घातल्याने तब्बल १०० नागरिक अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरही पाचारण करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे एसडीआरएफकडूनच बचाव पथक पार पडले. यामध्ये १०० नागरिकांची सुरक्षित सुटका झाली. मंत्री पाटील यांनी नाल्याच्या ठिकाणी संरक्षित भिंत तथा पूल उंच करण्यासंबंधी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. सरसकट पंचनामे करून मदत दिली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच गावकऱ्याकडून गावातील असलेली ३३ के व्ही तार बाहेर नेण्यात यावी,गावाबाहेरून येणाऱ्या नाल्यावर पुरुष संरक्षण भीत बांधून देण्यात यावी, तसेच पूरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे या मागणीच निवेदन देण्यात आले.
पालकमंत्री संजय राठोड यांनी पंचनामे करताना अधिकारी, कृषी साहाय्यक, तलाठी यांनी हयगय केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली. पुरात ज्यांचे कपडे, संसार उपयोगी साहित्य वाहून गेले, त्यांची यादी तयार करून मदत दिली जाईल व निवारा, भोजनाची व्यवस्था शासन करेल, असे सांगितले. यावेळी आ. नामदेव ससाने, आ. इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, एसपी डॉ. पवन बन्सोड, एसडीओ व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार संजीवनी मुपडे, बीडीओ टाकरस, प्रिया पुजारी, रामराव पाटील, विशाल पांडे, जगदीश नरवाडे, किशोर भवरे, किसन वानखेडे, दीपक आडे, प्रवीण ठाकरे , संदीपराव ठाकरे, डॉ. बोरुळकर , दत्तराव पवार ,गोविंद पवार, देविदास राठोड,आदी उपस्थित होते.



