पुसद नगरपरिषद क्षेत्रात विसंगत झोननिर्मितीमुळे नागरिकांवर अन्याय

पुसद :नगरपरिषदेने सन २०२३-२४ ते सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता कर आकारणीसाठी झोन नकाशा गावठाण प्रकाशित केलेले आहे. नगरपालिकेने केलेल्या विसंगत झोननिर्मितीमुळे नागरिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे संजय बैस शिवसेना तालुकाप्रमुख, दीपक उखळकर शिवसेना शहर प्रमुख, तसेच अनिल चव्हाण पाटील शिवसेना शहर संघटक यांनी विसंगती दूर करण्याबाबत निवेदन दिले आहे.पुसद शहरातील गावठाण हे अंदाजे २०० वर्षापेक्षा जुने असे गावठाण आहे. पुसद शहरात कित्येक नवीन लेआउट तयार होऊन नवीन गावठाण मध्ये लोक वस्ती निर्माण झालेली आहे. गावठाणा मध्ये वेगवेगळ्या आर्थिक विषमता असलेली नागरिक राहतात.या सर्व नागरिकांना एकाच कर आकारणीसाठी प्रभाग निहाय झोन नकाशा प्रकाशित करून नगरपरिषदेने आर्थिक विवंचनेमध्ये हलकीचे जीवन जगणारे कुटुंबांना सुद्धा धनसंपन्न नागरिकांच्या बरोबरीने कर आकारणी करण्याचे गावठाण झोनमुळे अन्याय होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.पुसद नगरपरिषद मध्ये बहुतांश प्रभागांमध्ये नवीन लेआउट निर्माण झालेले असताना अशा लेआउट मध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ५० वर्षापेक्षा जुने असलेला गावठाण झोन मध्ये टाकण्यात आलेले आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये इंदिरा वसाहत ही झोपडपट्टी असताना झोन क्रमांक ४ मध्ये टाकण्यात आलेली आहे.इतर प्रभागातील झोपडपट्टी झोन क्रमांक ५ मध्ये असताना इंदिरा वसाहत ही झोपडपट्टी झोन क्रमांक ४ मध्ये टाकल्यामुळे या वसाहतीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेवर आर्थिक भुर्दंड लादल्या जाणार आहे. नगरपरिषदेने समसमान झोन तयार न करता गावठाण बाबत विसंगत झोन तयार केल्यामुळे नागरिकांवर अन्याय होत आहे. अशी खंत निवेदनामध्ये मांडण्यात आलेली आहे. नागरिकांना आर्थिक न्याय देण्यासाठी गावठाण झोन मधील इतर प्रभागातील झोन समान करून नकाशा दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी निवेदनकर्त्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांच्याकडे केली आहे.मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद हे विसंगत झोनबाबत काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.



