गणेशपुर-पारडी शिवारात बिबट्याचा वावर; परीसरातील नांगरिकांनी दक्षता घेण्याचे वन विभागाचे आव्हान!

पुसद: तालुक्यातील गणेशपुर, पारडी निंबी, जांबबाजार शेत शिवारात बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे शेतशिवारातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गणेशपुर येथील गोठ्यातील जनावरावर बिबट्याने सलग दोन वेळा हल्ला करून पाळीव जनावरे फस्त केली होती. या घटनेने परिसरातील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने उपाययोजना राबवून परिसरातील ग्राम पंचायतीच्या सरपंचांना एका पत्राद्वारे सुरक्षा संदर्भात नागरिकांना सुचित करण्याबाबत आवाहन केले होते. व जंगल परिसरात वन विभागाच्या वतीने कॅमेरे बसविण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी ४:०० वाजण्याच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे चित्र टिपले आहे त्यामुळे तर या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे ही आढळून आलेत. वन विभागाच्या वतीने पुन्हा नागरिकांना आवाहन करण्यात येते की बिबट्याचा वावर परिसरात असल्यामुळे तो पुन्हा नागरी वस्ती कडे धाव घेऊ शकतो त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी याबाबत दक्षता बाळगावी असे आव्हान करण्यात आले आहे.



