पुसद उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील वृक्षांची अवैधरित्या कत्तल;विना परवाना वृक्ष तोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!

पुसद: येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालया समोरील डेरेदार झाडाची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून, हे झाड तोडण्यासाठी संबंधित उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यालयाने परवानगी घेतलेली नसून वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या पावसाचे दिवस असल्याने शहर व जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा असे सांगितले जात असले तरी पुसद शासकीय उपजिल्हा रुग्णालय कार्यालयाच्या आवारातील परिसरात असणारे भले मोठे झाडे स्वच्छतेचे नावाखाली विनापरवाना कत्तल केले जात आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद उपजिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना सावलीत बसण्याकरिता तसेच भरपूर ऑक्सिजन मिळण्यासाठी यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वेळोवेळी या रुग्णाच्या आवारातील परिसरात येथिल कर्मचाऱ्यांनीच वृक्षांची लावगड केली होती त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णालय परिसर हा हिरवागार होऊन निसर्गरम्य वातावरण तयार झाले होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबविली जाते. अकारण झाडांची कत्तल होऊ नये म्हणून कायद्याची कडक नियमावली देखील आहे. काही कारणास्तव झाड तोडायचे असल्यास यासाठी रीतसर वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना मात्र उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता रुग्णालयाच्या आवारातील विविध प्रकारच्या झाडांची अवैधरीत्या कत्तल करण्यात आली आहे.अशा प्रकारे झाडांची कत्तल करणे कायद्याचे उल्लंघन आहे.वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ज्या ठिकाणी झाडांची कत्तल झाली तेथील भागाचा पंचनामा करून ज्या अधिकाऱ्यांनी अविदरीत्या झाडांची कत्तल करण्याचे आदेश दिले त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी करीत आहे.



