काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजय पुरोहित यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला; भाजपला साथ देणार?

पुसद:काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान, गेली कित्येक वर्षांची काँग्रेसची साथ सोडून अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशासोबतच काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. या प्रवेशामुळे पुसद राष्ट्रीय काँग्रेसला गळती लागली आहे. पुरोहित यांच्या मागे बरेच कार्यकर्ते व चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. तर पुसद भाजपला व यवतमाळ लोकसभा तसेच पुसद विधानसभेत त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. पुसद येथील तरुण तडफदार अजय पुरोहित यांचा पुसद शहराच्या विविध सहकारी संस्था, स्वराज्य संस्था व शिक्षण संस्थेशी तसेच सामाजिक संस्थेशी जवळचा संबंध आहे. त्यांचा पुसद, महागाव व उमरखेड तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात चाहता व मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप पक्षाला येणाऱ्या विधानसभा व लोकसभा व इतरही निवडणुकीत मोठे पाठबळ मिळणार आहे. आपण जनहितार्थ व जनसेवेत गतिशीलता राहण्यासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याची स्पष्टोक्ती प्रसार माध्यमांशी फोनवरून बोलताना अजय पुरोहित दिली.



