शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला संधी मिळते त्याची उत्सुकता.? पुसद मतदार संघात रंगणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना, कोणाला मिळणार उमेदवारी?

पुसद: सध्या राज्यात विधानसभापूर्वी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही यापूर्वी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून २०मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची सुत्राची माहिती आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत. त्यात, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपटल्याचं दिसून येत आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदरांविरोधात युवकांना शरद पवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत लागले असून २० मतदारसंघात शरद पवार ज्या तरूण-युवकांना मैदानात उतरविणार आहेत, यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत. विधानसभेतील या २० मतदारसंघात अहेरी, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती यासारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे पुसद विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे त्याबद्दल उत्सुकता लागली आहे..? यामुळे शरद पवार राष्ट्रवादी गटात पुसद विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची संख्या वाढली आहे. आता याच विधानसभा मतदारसंघातून आदिवासी समाजाचे माजी समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य, राष्ट्रवादी लिगल शेलचे ॲड. अशीष देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी राठोड हे इच्छुक असल्याचे चित्र पाहायला मिळतआहे.तर परिवारातील माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक हे सुद्धा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार असल्याने या इच्छुकांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार गटातील इच्छुकांच्या मागणीनंतर या विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.येणारी विधानसभा निवडणूक ही या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी राहील हे मात्र चित्र स्पष्ट आहे. निवडणुकीपूर्वी वेळेवर आयाराम गयारामाची संख्या वाढणार असून यामध्ये भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एक इच्छुक पुन्हा निवडणुकीत उडी घेणार असल्याचेही चर्चा रंगू लागली आहे.पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा व्यक्तिरिक अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती,मराठा, मुस्लिम या जात घटकांचा प्रभाव आहे. जातीनिहाय मतदारांची टक्केवारी मतदारसंघातील जातीप्रभाव स्पष्ट करणारा असल्याने त्या अनुषंगाने राजकीय गणिते मांडली जाणार आहेत. त्याच अनुषंगाने इच्छुकांना उमेदवारी मिळेल असे जाणकाराचे मत आहे.



