जिल्ह्यातील सर्वाधिक कर प्राप्त करणारी श्रीरामपूर ग्रामपंचायतीला लवकरच मिळणार नगरपंचायतीचा दर्जा; शासनाने प्रस्ताव मागविला

पुसद: तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.ही मागणी लक्षात घेता या भागाचे विधान परिषदे सदस्य आमदार ॲड.निलय नाईक यांनी विधान परिषदेत या संदर्भात पाठपुरावा केल्याने या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा आमदार ॲड.निलय नाईक यांनी केला आहे.पंरतु श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतराच्या श्रेयवादावरून भाजप -राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.शहराला लागून असलेली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतची लोकसंख्या ही तीस हजारा पेक्षा अधिक आहे. औरसचोरस भौगोलिक अंतर पाच किमी आहे. सहा वॉर्डामध्ये विभागलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही १७ आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये श्रीरामपूर ग्रामपंचायत ही अग्रणी ठरते. त्यामुळे सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून श्रीरामपूर गावाचा उल्लेख होतो. जिल्ह्यात सर्वाधिक करप्राप्त करणारी ग्रामपंचायत म्हणून देखील श्रीरामपूर नावारूपास आहे.ग्रामपंचायत नियमानुसार प्राप्त होणारा निधी हा वाढत्या लोकसंख्येमुळे विकासात्मक कामाकरिता अपुरा पडत असल्याने नगरपंचायतचा दर्जा देण्यात यावा अशी मौखिक मागणी मागील २० वर्षांपासून केल्या जात आहे. ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अनेक विकासात्मक समस्यांना तोंड द्यावे लागते. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अन्वये नगरपंचायत जर असेल तर वेगवेगळ्या योजनेमधून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. पर्यायाने त्या गावाचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसून येते. श्रीरामपूर ही विस्तीर्ण वस्ती पाहता या ठिकाणी नगरपंचायत व्हावी हे स्वप्न ही तेथील नागरिक रंगवत होते. श्रीरामपूर ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये होण्यासाठी भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार ॲड.नीलय नाईक यांनी राज्यशासनास या बाबत पत्र दिले व त्यांनी विधानपरिषदेमध्ये सुद्धा प्रश्नाद्वारे नगरपंचायतची मागणी केली. त्याअनुषंगाने श्रीरामपूर ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्यातबाबत १९६५ च्या तरतूदीनुसार त्वरित प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्हापरिषदेकडून श्रीरामपूर ग्रामपंचायतीस प्राप्त झाले. दि.१ ऑगस्ट २०२३रोजी ग्रामपंचायतचे सरपंच आशिष काळबांडे व उपसरपंच संगिता परेश पांगारकर यांनी सदस्यांची त्वरित बैठक घेऊन पुनरप्रस्तावासाठी निर्णय घेण्यात आला. आमदार ॲड.निलय नाईक यानी शासनदरबारी केलेल्या मागणीचा पाठपुरावा म्हणून महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या तरतुदीनुसार प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जीपचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशीत केले,त्यानुसार संबंधित श्रीरामपूर ग्रामपंचायतीस नगरपंचायतचा दर्जा मिळणेबाबत प्रस्ताव तीन प्रतीत सादर करण्याचे पत्र स्थानिक गटविकास अधिकारी यांचेकडे धडकताच येथे नगरपंचायत दर्जा मिळण्यापूर्वीच भाजपा-राष्ट्रवादी पक्षात श्रेयवाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. नगरपालिका हद्दवाढीत श्रीरामपूर..? स्थानिक नगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी वारंवार शासन दरबारी हालचाली झाल्याचे सर्वसृत आहे. त्यात नगरपालिका सीमेलगत असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा ठराव देखील शासनाकडे प्रलंबित आहे. त्यात श्रीरामपूर, धनकेश्वर, बोरगडी तसेच काही अंशी काकडदाती या ग्रामपंचायतीचा प्रामुख्याने समावेश आहे. जर नगरपालिकेच्या ठरावानुसार हद्दवाढ झाली तर श्रीरामपूर सह इतर तीन ग्रामपंचायती या भविष्यात स्थानिक नगरपालिका क्षेत्रात गणल्या जातील. त्यामुळे श्रीरामपूरस्थित नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाऊ शकते.

आमदार ॲड.निलंय नाईक,मी मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे श्रीरामपूरला नगरपंचायतचा दर्जा मिळविण्याचे मागणीचे पत्र दिले व त्याबाबत आपण सभागृहात आग्रही मागणीही केली त्याचीच दखल राज्य शासनाने घेतली व त्यानुसार शासन दरबारी श्रीरामपूरला नगरपंचायतचा दर्जा बहाल करण्याच्या पुढील हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्याची प्रतिक्रिया भाजपा विधानपरिषद सदस्य आमदार ॲड. निलय नाईक यांनी सा.झेप न्यूज शी बोलताना सांगितले.

◆ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्राप्त होणारा निधी हा वाढत्या लोकसंख्येमुळे विकासात्मक कामाकरिता अपुरा पडत असल्याने नगरपंचायतचा दर्जा देण्यात यावा ही मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार ॲड.इंद्रनील नाईक यांचेकडे सन२०२१-२२ मध्ये केली व तद्नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे व तत्कालीन जीप मुख्य कार्येपालन अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांचेकडे आ.ॲड.इंद्रनील नाईक यांनी नगरपंचायत दर्जाबाबत जिल्हाधिकारी यांचे दालनात आमची बैठक घडविली. त्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठविला यात इतर कुणीही श्रेय घेण्याचे कारण नसून श्रीरामपूरला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्याविषयीचे पहिले पाऊल आ.इंद्रनील नाईक यांनीच उचलल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे श्रीरामपूरचे-
सरपंच आशिष काळबांडे यांनी सा. झेप न्यूज शी बोलतांना सांगितले.



