अंबोडा येथे युवा शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या !

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) :-तालुक्यातील अंबोडा येथे एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २२ ऑगस्टला सकाळी उघडकीस आली असून गजानन फकीरा गायकवाड (४३) असे या दुर्दैवी युवा शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन गायकवाड आपली वडिलोपार्जित शेतीची वहीती करायचा यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीनचे पीक घेतले शेताजवळच नाला गेला आहे. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुरात शेती खरडून गेली. लोकांचे कर्ज कसे फेडायचे आणि प्रपंच कसा चालवायचा या विवंचनेत शेतकरी गजानन गायकवाड होते. काल रात्रीच ते घरातून निघून गेले. आज सकाळी शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहा शेजारी विषाची बाटली आढळून आली असून नातेवाईकांनी महागाव पोलिसांकडे या घटनेची फिर्याद दिली. अतिवृष्टी आणि पिकांची झालेली नासाडी यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाला असून, अवघ्या बारा दिवसाच्या अंतरात महागाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मरण कवटाळल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेहाचे शवविच्छेदन सवना येथील ग्रामीण रुग्णालयात करून हजारो नातेवाईकांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले युवा शेतकऱ्यांच्या अचानक आत्महत्याने गावावर शोककळा पसरली आहे मृतक गजानन याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील भाऊ बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे



