ईतर

तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा कॉल आला होता, आता कुणाचा कॉल पाहिजे, असे म्हणत चौकशी अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी!

पुसद शहरातील बहुचर्चित कै. शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेचे जमीन विक्री प्रकरणाला आता नवे वळण;१०० कोटींची जमीन ३५ कोटीत विकण्याचा डाव, पोलीस अधीक्षकांकडे सहाय्यक निबंधकाची लेखी तक्रार!

यवतमाळ : पुसद शहरातील मागील काही दिवसापासून बहुचर्चित कै. शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या जमीन विक्री प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ३० मे २०२५ नुसार पुसदच्या सहाय्यक निबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशी सुरू आहे. घाटंजी येथील सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहेत. मात्र, १०० कोटी बाजारमूल्य असलेली जमिन केवळ ३५ कोटी एक लाखांत विकण्याचा प्रताप घडला. त्यावेळ पासून या जमिनी व्यवहार संदर्भात संबंधित प्रशासनाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सभासदांनी सुद्धा वारंवार तक्रारी केल्या होत्या तरीही या जमिनीचा व्यवहार करण्यात आला.

परंतु आता या जमिन विक्री प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यालाच धमकी दिल्याचा खळबजनक प्रकार पुढे आल्याने हे प्रकरण सध्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात गाजत आहे. तक्रारकर्ते सहाय्यक निबंधक अधिकारी कैलास खटारे यांनी दि. २ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार दिली आहे. खटारे यांच्या तक्रारीनुसार त्यांची नियुक्ती पुसद सहाय्यक निबंधक पुसद येथील जिनिंगच्या जागेच्या विक्रीचे प्रकरण कार्यालयाने ३० मे २०२५ च्या आदेशानुसार कै. शेषराव पाटील जिनिंग या संस्थेच्या कलम ८३ अंतर्गतच्या काही मुद्यांच्या चौकशीसाठी नियुक्ती केली होती. पुसद शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत तर जिनिंगची ही जमीन शहराच्या मध्यभागी असल्याने संचालक मंडळाने ही जमीन प्लास्टो कंपनीला केवळ ३५ कोटी १ लाखांत विकल्याने ही चौकशी सुरु झाली. खटारे यांनी तक्रारीत साय्यक निबंधकाच्या दाखल्यात सदर बाजारमूल्य तक्त्यात नमूद केलेले मूल्य दर हे मुंबई अधिनियमांतर्गत मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नमूद केल्याचे स्पष्ट केले आहे. सदर दर हे सर्वसाधारण असून त्यानुसार कलम- ३० अन्वये खुली जमिन ८ हजार रुपये प्रतिचौमीटर, निवासी सदनिकासाठी २५ हजार रुपये प्रतिचौमीटर, कार्यालयासाठी २८ हजार ७०० रुपये तर दुकानासाठी ३१ हजार रुपये प्रतिचौमीटर असा दर आहे. त्यानुसार जिनिंगची मालमत्ता चार हेक्टर ५ आर हे एवढी असून या १० एकर खुल्या जमिनीच्या दराने ४० हजार स्क्वेअर मीटर असे मिळून ३२ करोड एवढे मूल्यांकन येते. मात्र, सदर संस्थेची जमीन शहराच्या मध्यभागी असल्याने निवास व सदनिकेच्या दराने गणना करणे आवश्यक होते. त्यानुसार या जमिनीचे मूल्यांकन १०० कोटींचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, खरेदीखतात जमिनीची विक्री किंमत ३५ कोटी १ लाख रुपये दाखविल्याच म्हटले आहे. त्याचबरोबर या जमीन विक्रीची निविदा स्थानिक भाषेमध्ये करणे अभिप्रेत होते. जाहिरातीला प्रतिसाद मिळावा, असा पणन संचालकाचे आदेश होते. मात्र, सदर जमीन विक्रीची निविदा इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम-७० अन्वये संस्थेच्या गुंतवणुकीसंदर्भात तरतुदी आहे. ऑडिट अ-वर्ग मिळालेल्या जिल्हा किंवा राज्य बँकेत हा निधी गुंतवेल किंवा ठेव म्हणून ठेवील, अशी तरतूद आहे. ८ जून २०२२ पासून त्यात रक्कम असून बँक मात्र २०१८ पासून ब-वर्गात असल्याचे नमूद केले. जमीन विक्रीची जाहिरात ज्या वृत्तपत्राचा पुसद मध्ये खप नाही, अशा वृत्तपत्रात दिल्याचेही नमूद केले. मालमत्ता विक्रीची प्रक्रिया राबवितांना जागेचे बाजार मूल्यांकन पत्र घेतले नाही. तसेच विक्री प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने केली नाही. पुणे येथील सहकार आयुक्तांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी या मालमत्तेच्या विक्रीची परवानगी दिली होती. मात्र, त्याला विलंब लावल्याचे खटारे यांनी म्हटले आहे. २०२० च्या परवानगी आधारेच विना ई-निविदा ही जमीन विक्री प्रक्रिया केल्याचे नमूद आहे. त्याचबरोबर मुदत संपलेल्या संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेवु नये, असे नमूद असतांना त्यांनी संस्थेच्या जागेची विक्री केल्याचे म्हटले आहे. सदर जागा नागपुरातील प्लास्टो कंपनीने खरेदी केली आहे. यामध्ये यवतमाळातील एका नेत्याच्या नातलगाचे नावसुद्धा नमूद केले आहे. चौकशी सुरू असतांना यवतमाळात भाडेकरू म्हणून रहीवासी असलेल्या खटारेंच्या घरी सदर आमदाराचा नातलग पोहोचला. त्यांनी पुसदच्या जिनींगच्या जागेची चौकशी पूर्ण झाली कां, अशी खटारेंना विचारणा केली. त्या दरम्यान, खटारेंनी त्यांना चौकशीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, सदर व्यक्तीने या चौकशीत आम्हाला क्लिनचिट द्या, असे म्हटल्याचेही नमूद केले आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा कॉल आला होता, आता कुणाचा कॉल पाहिजे, असे म्हणत सदर व्यक्तीने जोरजोरात बोलायला सुरुवात केली. एकंदरीत खटारेंना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत नमूद केल्याची सुत्रांची महीती आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसिंग च्या जागेचा वाद पुन्हा उफाळला असून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close