पुसद: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी लोकसभेतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघ्या ८ दिवसाचा कालावधी उरला असताना महायुतीतील घटक पक्ष एकमेकांमध्ये भांडताना दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.प्रचाराची धूरा पुसद मतदारसंघात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार ॲड. निलयभाऊ नाईक, राष्ट्रवादी आजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडील मुख्य गटाकडे आसल्याने जुनी भाजप व नवीन भाजपात गटतट उफाळून येत असल्याने नाराजी नाट्य सुरु आहे.तर राष्ट्रवादी सुध्दा याला काही अपवाद नाही एकीकडे खासदार भावना गवळी यांची नाराजी सर्वश्रृत आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी नसल्याची माहिती दिली होती परंतु खासदार भावना गवळी ह्या मुख्यमंत्री शिंदे गटात गेल्याने मुळचे शिवसैनिक हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहेत. बोटावर मोजण्याइतके शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने महायुतीच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले)यांच्या प्रचारात शिवसेना दिसूनच येत नाही. मानापानामुळे प्रचाराऐवजी अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासह त्यांच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापही शहरासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील बहुतांशी नागरिकांना या निवडणुकी विषयी उदासीनता दिसून येत आहे. केवळ बोटावर मोजता येतील पक्षाचे कार्यकर्ते या प्रचारात दिसत आहे. उमेदवाराचा मतदाराशी संपर्क कमी झालेला दिसतो होणारा खर्च पाहता निवडणुका लढवीने सामान्य नागरिकांना शक्य नाही पण कायकर्ता वर्गावर निवडणुका जिंकता येते हा समज उमेदवारांनी काढून टाकला पाहिजे कारण कोणता कार्यकर्ता आतून कोणत्या उमेदवारांचा प्रचार करीत आहे हे कळायला मार्ग नाही. आज अनेक कार्यकर्ते आपल्या मागे काही मतदान आहे. याचा भास दाखवीत आहे मात्र हा संशोधनाचा विषय आहे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक कार्यकर्त्यावर गाव-गावातील खेड्यात-पाड्यातील जनता नाखूष आहे,त्यामुळे उमेदवाराला याचा विनाकारण फटका बसणार आहे.तर दुसरीकडे काही निष्ठावंत कार्यकर्ते वषार्नुवर्षे पक्षात कामे करीत आहे पण त्यांना मानपान मिळत नसल्याचे ते कार्यकर्ते या निवडणुकीपासून दुर आहेत उमेदवार मात्र अशा कार्यकर्त्यावर आंधळा विश्वास ठेवून असल्याचे चित्र आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ४०० पार’ चा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने प्रत्येक नेत्याला त्याच्या दोन बूथवर ५१% मतांचा टार्गेट देण्यात आले आहे.त्यानुसार राज्यात मिशन ४५ प्लस साठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे.भाजपच्या आमदारांनाही पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. विधानसभेचे तिकीट हवे असल्यास लोकसभेला तालुक्यातून मोठे लीड देण्याच्या सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे.या लोकसभेची निवडणूक जिंकणे भाजपला सुरुवातीला सोपे वाटत होते, असे असली तरी महाविकास आघाडीने आता चांगलीच चुरस निर्माण केली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटीलयांनाही ही निवडणूक सोपी राहिली नाही, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी कडवे आव्हान उभे केले असून जातीपातींची समिकरणांनी योग्य साथ दिल्यास महायुतीचे उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या धोरणांसाठी उन्हातान्हात सामान्यांपर्यंत पोहचणारे कार्यकर्त्यांकडे महायुतीच्या स्थानिक नेत्यांकडून दुर्लक्ष केले जात आसल्याचे चित्र आहे.नेते तुपाशी कार्यकर्ते मात्र उपाशीच गत प्रचारात कार्यकर्त्यांची सुरू असल्याने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान दिसून येत आहे.त्यामुळे कार्यकर्ते हतबल झाले आहेत.ऐनवेळी सौ.राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी फार कमी अवधी मिळाला आहे. त्यातच त्या नांदेडच्या रहिवासी असल्याने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात त्यांचे माहेर आहे. त्यामुळे – यवतमाळ मधील नेर तालुक्यात आणि त्या परिसरात काही अंशी मतदार त्यांना ओळखत असतील मात्र, ६ विधानसभा मतदार संघ, २ जिल्ह्यातील १२तालुके आणि २७०० गावात त्यांना प्रचार करावा लागणार आहे. तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघातून त्यांचे पती खासदार आहेत. त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर होवून स्थानिक भाजपाच्या दबाव तंत्रामुळे ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली. त्यांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशीम मधून उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्यापासून आदिवासी व बंजार समाज दुखावला गेला होता याचा फटका बसणार आहे.या निवडणुकीत बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरल्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. राजश्री पाटील ह्या या मतदारसंघासाठी नवख्या उमेदवार आसल्याने त्यांना मते मिळाण्यासाठी मतदारपर्यंत पोहचणे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे व महायुतीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचारात आत्यंत कमी प्रतीसाद आसल्याने नेत्यांना फंड मिळाला परंतु कार्यकर्त्या प्रर्यत्न न पोहोचल्याने प्रचाराला प्रतीसाद मीळत नसल्याचे चित्र आहे.नेत्यांनी सत्तेचा मलिदा चाखायचा आणि कार्यकर्त्यांनी फक्त माईक टेस्टिंग, सतरंजी उचलणे, हातात झेंडे आणि तुणतुणे वाजवायचे का..?पत्रकार नेहमी या नेत्यांबद्दलच लिहितात. त्यांचे फोटो व बातम्या छापतात. त्यांना प्रसिद्धी देतात. परंतु कधीतरी आमच्या देखील व्यथा बातमी स्वरूपात मांडा. अशी कळकळीची व आग्रहाची विनंती पदाधिकारी व कार्यकर्ते नाव न सांगण्याच्या अटीवर करत आहेत. अनेक वर्षे झाली, परंतु आम्ही केवळ यांच्या सतरंज्या उचलण्याचेच काम करायचे का..? स्टेजवर हॅलो! माईक टेस्टिंगच म्हणायचे का? अशी देखील संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गेले वर्षानुवर्ष केवळ काही ठराविक नेते मंडळीच सत्तेचा मलिदा चाखत आहेत. आम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र एकनिष्ठ राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून झिजतोय. शेव-मुरमुरे व भजे-आलुवडे खाऊन दिवस-रात्र काढतोय. हे मात्र निवडून आली की आम्हाला हळूच बाजूला करतात. या पक्षातुन त्या पक्षात उड्या मारतात नंतर आम्हाला साधं कुणी विचारतही नाही कींवा ढुंकूनही पाहत नाही. मात्र काही महत्वाचं काम असलं की आम्हाला हे नेते मंडळीं रात्री – बेरात्री हक्काने फोन करतात. सभेसाठी कार्यकर्ते गोळा करा, बॅनर लावा, गर्दी करा, फुलं उधळा, रांगोळी काढा, हातात झेंडे घ्या, घोषणा द्या, आंदोलन करा, मोर्चे काढा, निवेदन द्या, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी,जयंती, पुण्यतिथी, शिबिर,भाऊचा बर्थडे करायचा आणि पेपरला नाव व फोटो कुणाचे तर यांचे आणि आमचे नाव शेवटच्या ओळीत. आदी, इत्यादी, असंख्य जण उपस्थित होते. अशा शब्दात येणार. हे असे आमच्या बाबतीत नेहमीच घडतेय बघा. लाठ्या – काठ्या आम्हीं खायच्या. अंगावर केसेस आम्ही घ्यायच्या. आम्हीच आमच्या पैशाने केस लढायची आणि बाहेर आल्यावर मात्र यांनी नेहमीप्रमाणे गळ्यात हात घालायचा आणि पुन्हा एकदा लढ म्हणायचं. हे असं किती दिवस बरं चालायचं. असाही प्रश्न ते या निमित्ताने उपस्थित करताना दिसत आहेत.थोडक्यात काय तर पदाधिकाऱ्यांनी करायचे कार्यकर्ते गोळा आणि कार्यकर्त्यांनी करायच्या सतरंज्या गोळा? हे असे किती दिवस चालायचे निवडणूका आल्याकी घरादारावर तुळशी पत्र ठेवुन यांचा प्रचार करयाचां अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे बघा. त्यामुळे नेते तुपाशी तर कार्यकर्ते मात्र उपाशी. अखेर अशी म्हणण्याची वेळ आलीय..अशी व्यथा कार्यकर्त्यांनी मांडली.तर लोकसभा मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात हक्कांच्या मतांमध्ये विभाजन दिसते आहे त्यात ही कार्यकर्त्याची नाराजी उमेदवाराच्या पथ्थ्यावर पडू शकते. असेही जाणकार बोलत आहेत.