यंदा उन्हाळी ज्वारीच्या उत्पादनात भरीव वाढ मात्र, ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱी आर्थिकअडचणीत!

पुसद: तालुक्यात सिंचनाची व्यवस्था असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीचा पेरा घेतला. ज्वारीचे पिक उत्तम असुन एकरी १५ ते २० क्विंटल ज्वारी उत्पादन झाले आहे.पारंपरिक पिकांची वाट सोडून नवीन पीक घेण्यासाठी शेतकरी धडपडत असतानाच एकीकडे बाजारपेठेतील दर मात्र शेतकऱ्याच्या मालाला मारक ठरत आहेत आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने मशागत व इतर कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. परंतु हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.लोकसभा निवडणुकीत एकीकडे गॅरंटी वर गॅरंटी दिली जात असतांना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यासाठी अद्याप सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत हिच कां गॅरंटी.. असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे.शासनाने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे हमीभाव जाहिर केले असले तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या उन्हाळी ज्वारीची खरेदी हमीभावाने केल्या जात नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.यंदा सोयाबीन,कपाशी व तुरीचा बहुतांश शेतकर्यांनी पेरा केला होता. सोयाबीनवर आलेल्या एलो मोझॅकमुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकर्यांनी हरभरा पेरणी केली परंतु पेरणी दरम्यान व पेरणीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकर्यांचे हरभर्याचे पिक करपले तर काहींनी अटोकाट प्रयत्न करुन पिकाला वाचविले.परंतु पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा मोडून ज्वारी पिकाला पसंदी देत पुसद तालुक्यात तब्बल एक हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर जानेवारी महिन्यात ज्वारीची पेरणी केली.पेरणी नंतर अस्मानी संकटामुळे ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना महागडे रासायनिक कीटकनाशके फवारून पीक वाचवावे लागले. अनेक भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पीक आडवे पडून नुकसान झाले तरीही हा शेतकरी डगमगला नाही. ज्वारीला असलेल्या बाजारभावामुळे आतातरी आर्थिक तूट भरून निघेल या आशेने पिकाचे संगोपन केले. ज्वारी काढणी वेळी पुन्हा अवकाळीचे संकट आल्याने मजुरानींही आपली मजुरी वाढवली व शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली. त्यावरही मात करून शेतकऱ्यांनी पीक काढणी केली.व तब्बल १५ ते २० क्विंटल एकरी उत्पादन काढून मोत्याच्या दान्यांना घरी आणले. ज्वारीला ३१८० रुपये हमीभाव मिळेल या आशेवर शेतकरी होता परंतु शासन केवळ खरीप व रब्बी पेर्याची सातबारावर नोंद असलेल्या शेतकर्यांचीच नोंदणी करीत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी ज्वारीचे भाव पाडले असून तब्बल १८०० ते १९०० रु इतक्या कमी भावाने शेतकर्यांना ज्वारी विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने खरीप व रब्बी असा भेदभाव न करता उन्हाळी ज्वारीलाही हमीभावाने खरेदी करुन दिलासा द्यावा अशी शेतकऱ्याच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे.
किसान मार्केट यार्डला नाफेडची नोडल एजंसी असून ३१ मे पर्यंत हमीभावाने खरेदी करण्यासाठी ज्वारी पिकाची नोंदणी सुरु असून रब्बी पिकांतर्गत नोंद असलेल्या शेतकर्यांचीच नोंदणी चालू आहे. उन्हाळी ज्वारी नोंदणी संदर्भात नाफेडकडून कुठलेही निर्देश नसल्याने उन्हाळी ज्वारीची नोंदणी सुरु नाही. —यशेस अग्रवाल किसान मार्केट यार्ड(खाजगी) पुसद,
यंदा कपाशी पिकाने दगा दिल्याने जानेवारी महिण्यात कपाशी काढून सहा एकर क्षेत्रावर ज्वारीचे पिक घेतले.जवळपास १०० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे.नाफेडच्या अधिकृत केंद्रावर उन्हाळी ज्वारी हमीभावाने खरेदी केल्या जात नसल्याने आम्ही शेतकर्यांनी तहसिलदार यांची भेट घेऊन हमीभावाने ज्वारी खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याची मागणी केली आहे.-अशोक चंद्रवंशी शेतकरी वालतुर रेल्वे,ता.पुसद,
खरीप हंगामातील पिक आगोदरच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरावुन घेतला लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रुपया उरला नाही. शेतकऱ्यांना पैशांची नित्तांत आवश्यकता असताना रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकरी अपेक्षा लावून होता. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळेलच अशी आशा असताना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.त्यातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड केल्याने उत्पादन वाढले आहे. ज्वारीच्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती शेतीत ७० टक्के खर्च मजुरी किंवा यांत्रिक हार्वेस्टिंगमध्ये केला ज्वारीचा उत्पादन खर्च काढल्यानंतर त्याचा हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे या प्रश्नाकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणारे शेतकऱी आर्थिक अडचणींत आले आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांची भाव वाढ , त्यातच निसर्गाची अवकृपा, शेतीसाठी मजुरांची कमतरता मजुरी वाढत चालल्याने शेतीचा खर्च वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी झाले असून शेती आता आर्थिकदृष्ट्या नपरवडणारी आहे.त्यामुळे या कृषी प्रधान देशात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तरच शेती आणि शेतकरी टिकेल परंतु या सरकारकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे. – संभांजी टेटर शेतकरी वरुड,



