शिक्षकासाठी पंचायत समितीमध्येच भरली शाळा; भंडारी जि.प. शाळेत शिक्षकाचा अभाव!

पुसद : तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकांचा आभाव आसल्याने संतापलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत पुसद पंचायत समितीमध्येच २०सप्टेंबर२०२३ रोजी शाळा भरवली. शिक्षकाच्या नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर विद्यार्थी माघारी परतले.गट विकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन केले. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत पंचायत समितीच्या आवारातून न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ११० असून शाळेची गुणवत्तेची परंपरा कायम आहे. मंजूर शिक्षक संख्या चार असून तीनच शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी एक शिक्षिकेची बदली इतरत्र करण्यात आली होती. शाळेवर दोनच शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पंचायत समितीकडे तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची कोणत्याही प्रकारे दखल घेतल्या गेली नाही. अखेर दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने दि २०सप्टें रोजी सुमारे जिल्हा परिषद शाळेतील ७५ विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ राठोड यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात भंडारी येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील व गावांतील नागरिक व संतापलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत पुसद पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून आंदोलन केले. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत पंचायत समितीच्या आवारातून न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. त्यावेळी पंचायत समितीच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची धांदल उडाली होती.
पालाकांचा संताप पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनाची तात्काळ दखल घेत संबंधित शिक्षिकेची केलेली बद्दली तात्काळ रद्द करून त्यांना भंडारी येथे सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच जिल्हा खनिकर्म विकास निधीतून एक स्वयंसेवक नियुक्तीचा आदेश ही पारित करण्यात आला आहे. सतीश पाटील व शाळा समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व पालक यांच्यावतीने गटविकास अधिकारी संजय राठोड व गटशिक्षणाधिकारी आवटे मॅडम यांचे आभार मानण्यात आले.