पुसद येथे भव्य सांस्कृतीक भवन होणार!

पुसद:दिवसेंदिवस पुसद शहराची लोकसंख्या वाढत असल्यामूळे सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतीक भवनाची निर्मिती करावी अश्या आशयाची मागणी पुसदचे माजी नगरसेवक भाजपा गट नेते निखील चिद्दरवार यांनी राज्याचे वन तथा सांस्कृतीक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. उपरोक्त विषयाला अनुसरून पुसद नगर परिषदेला “ब” दर्जा प्राप्त असून १९३१ साली पुसद नगर परिषदेची स्थापना झाली असून शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला भव्य सांस्कृतीक सभागृह नाही. यापूर्वी नगर परिषद द्वारा टाऊन हॉल ची निर्मिती करण्यात आली होती परंतु नगर परिषदेचा वाढता व्याप आणि बाजार संकुल निर्मितीमुळे टाऊन हॉल मोडकळीस आले. शहराचा विस्तार बघता शहराच्या हृदय स्थानी एखादे सांस्कृतिक सभागृह उभारले जावे ही जनतेची मागणी लक्षात घेऊन भाजपाचे निखिल चीद्दरवार यांनी नुकतेच ना. मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. त्याची त्वरित दखल घेऊन सांस्कृतीक कार्य मंत्री या नात्याने स्वतः मंत्री महोदयांनी संबंधीत विभागाच्या प्रधान सचिवांकडे सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. पुसद शहरातील तलाव ले आउट मध्ये नगर परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक वाचनालयाच्या खुल्या जागेत सांस्कृतीक सभागृह साठी जागा उपलब्ध होवू शकते. सदर सभागृहाच्या बांधकामास सुमारे १५ कोटी निधी आवश्यक असून तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशीही मागणी निखील चीद्दरवार यांनी केली आहे.



