सामाजिक

रोजगार कौशल्यातून युवकांना उभारी देणाऱ्या ज्ञानेश्वर अजमिरे यांचे कार्य प्रेरणादायी : आयएएस डॉ. नंदकुमार बेडसे

विद्या शॉर्टहॅन्ड अँड कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट’च्या यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा!

पुसद : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात रोजगाराची किल्ली देणारा, कष्ट, चिकाटी आणि समर्पण यांचा साक्षात्कार घडविणारा एक भावस्पर्शी सोहळा रविवारी पुसद येथे अनुभवायला मिळाला. लघुलेखन व संगणक टंकलेखनाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळविणाऱ्या ‘विद्या शॉर्टहॅन्ड अँड कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा पुसदकरांसाठी केवळ कार्यक्रम नव्हता, तर तो कृतज्ञतेचा, अभिमानाचा आणि आनंदाचा उत्सव ठरला.

सुमारे ३२ वर्षांपूर्वी पुसदच्या विद्यानगरीत एका छोट्याशा खोलीत ज्ञानेश्वर अजमिरे यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीची बारा वर्षे संघर्षाची परीक्षा होती. मात्र, न डगमगता, न थकता त्यांनी लघुलेखना 9सारखा कठीण विषय विद्यार्थ्यांसाठी सुलभ केला. त्यांच्या जिद्दीच्या बळावर आज या संस्थेतून पाचशेहून अधिक विद्यार्थी घडले असून, त्यापैकी शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांत लघुलेखक म्हणून सेवा देत आहेत. अनेक विद्यार्थी टंकलेखक म्हणूनही कार्यरत आहेत.या यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘कुंभमेळा’ आणि पालकांचा मनोमिलन सोहळा शनिवारी मांगिलाल दादा मंगल कार्यालयात पार पडला. आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने सभागृह भारावून गेले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथील अध्यक्ष, आयएएस अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य लघुलेखन व संगणक टंकलेखन संघटना, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश कराळे, जिल्हाध्यक्ष तुळशीदास खसाळे, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने, नगरसेवक ऋषीराज पंडितकर, सुप्रिया बेडसे आणि संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर अजमिरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविकात ज्ञानेश्वर अजमिरे यांनी संस्थेच्या प्रवासाची भावपूर्ण उजळणी करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या हातात रोजगारभिमुख कौशल्य देणे हेच आमचे ध्येय राहिले आहे.” त्या समर्पणातूनच आज अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले, हेच आपले खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रा. दिनकर गुल्हाने यांनी ‘यशस्वी विद्यार्थ्यांचा हा महाकुंभ मेळावा म्हणजे विद्या संस्थेची अमृतकुंभासारखी भूमिका आहे’, असे सांगत ज्ञानेश्वर अजमिरे यांचा ‘फॅक्टरी ऑफ एम्प्लॉयमेंट’ या शब्दांत गौरव केला. प्रकाश कराळे यांनी या संस्थेचे कार्य पाहून स्वतः मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणे हेच संस्थेच्या गुणवत्तेचे प्रमाण असल्याचे नमूद केले. मारुती वाठ यांनी संघर्षातून उभी राहिलेली ही यशोगाथा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.यावेळी माजी विद्यार्थी प्रांजली पवार, सुदेश साखरे यांनी आपल्या गुरूविषयी कृतज्ञता, ऋणानुबंधाचे शब्द व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केतकी अलोणे व दीपाली देशमाने यांनी केले. केतकी हिने गायलेल्या ‘विठ्ठल पाहिला’ या गुरुची प्रशंसा करणाऱ्या गीताने सभागृह स्तब्ध झाले. अतुल घुले यांनी आभार मानले. सभागृह तुडुंब भरले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि स्वप्नपूर्तीचे तेज झळकत होते.

 

 

महाराष्ट्रातील उत्कृष्ट ‘विद्या’ संस्था : डॉ. नंदकुमार बेडसे

 

महाराष्ट्रातील लघुलेखन संस्थांच्या परीक्षाफलाचा आढावा घेतला असता, पुसदसारख्या ग्रामीण भागातील विद्या शॉर्टहॅन्ड अँड कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट ही निश्चितच उत्कृष्ट संस्था ठरते. इतर संस्थांचा सरासरी निकाल ४७ टक्के असताना, या संस्थेने ७४ टक्क्यांपेक्षा अधिक यश मिळविले आहे. अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असणे ही अभिमानाची बाब आहे. यामागे संस्थाचालक ज्ञानेश्वर अजमिरे व त्यांच्या कुटुंबीयांची समर्पण वृत्ती आहे. भविष्यात रोजगार देणाऱ्या अशा शॉर्टहॅन्ड संस्था प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्याचा मानस असल्याचे डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून मोठी स्वप्ने साकार करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close