विद्यार्थ्यांना ‘गुड’ टच- ‘बॅड’ टच ओळखता यायला हवा एसडीपीओ हर्षवर्धन बीजे : जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात मार्गदर्शन!

पुसद : शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्को कायदा अमलात आला आहे. अठरा वर्षापेक्षा कमी वयातील मुलांवर लैंगिक अत्याचार झाला तर त्याची तक्रार करता येऊ शकते. या तक्रारीची माहिती न दिली तरीसुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो. लैंगिक अत्याचाराला अटकाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच ओळखता आला पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी केले.
येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात शुक्रवार ता. तीन रोजी ‘करियर व कायदेविषयक’ मार्गदर्शन कार्यक्रमात हर्षवर्धन बीजे बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधून लैंगिक अत्याचार, वाहतूक नियम, विद्यार्थ्यांचे होणारे अपहरण, त्यांची सुरक्षितता तसेच स्पर्धा परीक्षेतील तयारीचे टप्पे याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने होत्या. सरस्वती पूजन व वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे अपघात टाळता येतील. पालकांनी वाहन चालवताना हेल्मेट घालावे, त्यादृष्टीने ज्यांना जागृती पालकांमध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी यूपीएससी परीक्षेतील स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना कथन करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. यूपीएससीची परीक्षा कठीण असली तरी या परीक्षेत प्रयत्नपूर्वक यश संपादन करू शकते, हे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. या परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी काही प्रश्न त्यांना विचारले तेव्हा हर्षवर्धन यांनी समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. माधवी गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी तारुण्याच्या उंबरठ्यावर ,गुड टच बॅड टच, कळी उमलताना, पोस्को व महिला सुरक्षा विषयक कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन वर्षा इंगळे यांनी केले व आभार मानले या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.