पुसद शहरात नवरा मंत्री व दरबार मात्र बायको घेते, या शब्दात पत्रकार परिषदेत म.प्र.काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिलीप एडतकर यांची बोचरी टीका..
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आक्रोश मतपटीतून दिसेल..

पुसद: सध्याच्या काळात ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. महागाईने जनता पिचलेली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग उद्भवला आहे. अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील आक्रोश मतपेटीतून नक्की दिसून येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तसेच पुसद विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे निरीक्षक दिलीप एडतकर यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांची बैठक पुसद येथील डी एन ग्रुप हॉल येथे रविवार ता.१९ रोजी पार पडली. बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम यांच्या कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत कार्यकर्त्यांशी विचार विमर्श करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुसद विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती विचित्र असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या भरवशावर सत्ता उपभोगली. त्यांच्या वारस लोकांनी संघाच्या पॅंटी घातल्या आहेत. सत्तेसाठी प्रस्थापित व्याकुळ झाले आहे. पुसद मध्ये नवरा मंत्री व दरबार मात्र बायको घेते, या शब्दात त्यांनी बोचरी टीका केली. शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेतील राजकारण ढवळून निघेल, असे एडतकर यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ‘कुठे युती, कुठे भीती’ अशा परिस्थितीत स्वबळावर तर समन्वय साधून प्रयत्न करण्यात येतील. या निवडणुकांसाठी प्रत्यक्षात आघाडी झालेली नाही. परिस्थिती पाहून नेतृत्व निर्णय घेतील. मात्र आघाडीत ओढाताण राहणार नाही. महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
पुसद नगरपालिकेत नगराध्यक्ष सह सर्वच जागांवर काँग्रेस पक्ष लढत देईल. सोबत मित्र पक्षांना घेण्यात येईल, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व पुसद येथील काँग्रेस नेते डॉ. मोहम्मद नदिम यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहे. अद्यपी आपला एकमेव अर्ज आहे, असे सांगून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचा संकेत दिला. या पत्र परिषदेला नगरपालिका निवडणूक पक्ष निरीक्षक संजय मोघे, शहराध्यक्ष जिया, ॲड गजानन देशमुख अनिल शिंदे ईस्त्याक भाई व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



