सावली नसावी कधी दुर्जनांची! विजयादशमी निमित्त साई मंडळाच्या भजन संध्येने श्रोते मंत्रमुग्ध! -गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार !

पुसद : ‘संगत करावी सदा सज्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची’, हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित अभंग येथील उत्कृष्ट तबलावादक बाळू परतवार (पार्डी) यांनी ‘और इस दिलमे क्या रखा हैं!, तेरा ही नाम लिखा रखा हैं!!’ या ‘ईमानदार’ (१९८७) चित्रपटातील गायक सुरेश वाडकर व आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेल्या सदाबहार गीताच्या चालीवर आपल्या खड्या आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा,पुसदच्या पुढाकाराने विजयादशमीनिमित्त आयोजित साई भजनी मंडळाच्या भजन संध्येचे. येथील देशमुखनगरमधील गुरुदेव सेवा मंडळाच्या साप्ताहिक सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी डॉ राजेंद्र जाजू यांच्या नेतृत्वातखाली साई भजनी मंडळाचा बहारदार भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे होते. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शिर्डीचे साई बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. याप्रसंगी डॉ राजेंद्र जाजू, अजय जाजू, भैय्या पद्मावार, प्राचार्य ठाकूरदास बुब, कृष्णा कदम, विनय व्यवहारे, अनिल व्यवहारे, साहेबराव देवसरकर, डॉ शरद राऊत, अनिल शिंदे, अनिल अस्वार, ताई बुब, ताई जाजू, ताई कदम आदींनी वारकरी संप्रदाय, शिर्डीचे साईबाबा, गवळण आदींसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची एकापेक्षा एक अशी सरस खंजिरी भजने आपल्या सुमधुर आवाजात सादर करून श्रोत्यांना तब्बल तीन तास खिळवून ठेवले. हार्मोनियमची साथ डॉ शरद राऊत व अजय जाजू यांनी तर तबल्याची साथ बाळू परतवार व अनिल अस्वार यांनी दिली. तत्पूर्वी गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खंजिरी भजने सादर करून विजयादशमी उत्सव साजरा केला. 
याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने साई भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ‘ग्रामगीता’ ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्वांनी राष्ट्रसंतांच्या चरणी सोने अर्पण करून दर्शनाचा लाभ घेतला. 
यशस्वितेसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, उपाध्यक्ष मनोहर बनस्कर, कोषाध्यक्ष सुरेश कदम, माधव जाधव, नरेश ढाले, ज्ञानेश्वर ताकतोडे, बाबासाहेब वाघमारे, शंकर वाघमारे, राजू पुरी, विठ्ठल येवले, वसंत ढोणे, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पुसद शहर व परिसरातील गुरूदेव अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



