ईतर

पुसद येथे शिवरायांना पोवाड्यातून अभिवादन;गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार.    

पुसद : येथील गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखेच्या पुढाकाराने कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरुदेव अनुयायांनी साग्रसंगीत पोवाडा व विविध गीतांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे होते.प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, सहसचिव तथा शिवशाहीर पांडुरंग बुरकुले, प्रा शंकर दंडारे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली.  यावेळी शिवशाहीर पांडुरंग बुरकुले यांनी १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झालेला शिवरायांचा जन्मोत्सव, जिजाऊंचे संस्कार, राजांचा पराक्रम, रयत व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आदी विविध प्रसंगांवर आधारित मुस्लिम शाहीर अमर शेख लिखित ‘ एके रात्री सह्याद्री हसला, हसताना दिसला ‘ हा पोवाडा आपल्या पहाडी आवाजात तर गुरुदेव अनुयायी पुंडलिक भालेराव यांनी महाकवी वामनदादा कर्डक लिखित ‘ शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू – मुसलमान’ हे गीत आपल्या खड्या आवाजात साग्रसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.याप्रसंगी प्रा नंदकुमार खैरे व प्रा शंकर दंडारे आदींनी शिवजयंती व गजानन महाराज प्रकट दिनानिमित छत्रपती शिवाजी महाराज व संत गजानन महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय समारोप करताना प्रा प्रकाश लामणे यांनी शिवरायांच्या यशस्वी राज्यकारभाराचे धोरण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत उतरविल्याचे सांगितले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर बनस्कर, कोषाध्यक्ष सुरेश कदम, सहकोशाध्यक्ष माधवराव जाधव, विठ्ठलराव येवले, वसंतराव ढोणे, बाबासाहेब वाघमारे, महिला प्रतिनिधी छाया लामणे, इंदू पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुसद शहर व परिसरातील गुरुदेव अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close