पुसद शहरांसाठी जीवनदायी असलेले पूस धरण झाले ‘ओव्हर फ्लो’

पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण बुधवारी रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे पुसद शहराचा पाणी प्रश्न व शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. ओव्हर फ्लो झालेले धरण पाहण्यासाठी पुसदकरांनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे.
काही दिवसापासून धरणाच्या वरील भागास पुसद परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने अवघ्या काही दिवसात या धरणाचा जलसाठा वाढला आहे. पुसद शहराला पाणीपुरवठा करणारे पूस धरण गत उन्हाळ्यात तळाला गेले होते. मात्र यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी धरण परिसरात संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूस धरण बुधवारी रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कर्मचाऱ्यांनी दिली आणि पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने धरण परिसरात चांगला पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता व नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पुसदकरांना आता नियमित पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.



