आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हा आमचा वारसा -अनिरुद्ध पाटील चोंढीकर
श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न

पुसद: स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच शिक्षक-पालक सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद च्या सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर, मार्गदर्शक श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर तर प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी संतोष बळी, सरिता कुरकुटे, संध्या मस्के सोबतच प्राचार्य रामचंद्र हिरवे, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे विचारपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सारंग कोरटकर, महिंद्र अंबुरे यांच्या सरस्वती स्तवनाने पाहुण्यांच्या स्वागतानंतर सभेला सुरुवात झाली. प्रा गजानन जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शालेय व सहशालेय उपक्रमाची सविस्तर माहिती दिली २५०० विद्यार्थी आज आमच्या विद्यालयात शिक्षण घेत असून, पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सर्वतोपरी साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम या विद्यालयात केले जाते. शिवाय मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी आमची शाळा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळा तीन शिफ्ट मध्ये चालत असताना वर्ग ५ ते ८ मधून सचिन नालींदे वर्ग ९ व १० मधून पर्यवेक्षीका प्रज्ञा गडदे वर्ग ११ व १२ मधून प्रा. निलेश जाधव यांनी आपा आपल्या शिफ्ट मध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना दिली. याबाबत सर्व पालक अत्यंत समाधानी असल्याचे मत पालक प्रतिनिधी संतोष बळी यांनी व्यक्त केले. पालक ज्ञानेश्वर झाडे व नवनाथ देशमुख यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आपले पाल्य हे केवळ ६ तास शाळेत असतात. इतर वेळेत ते आपल्या सोबत असताना आपण त्यांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देऊन शिक्षकांना शिस्तीच्या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करून शिक्षक व पालकांमध्ये समन्वय घडवुन आणावा असे मत व्यक्त केले. हे विद्यालय पुष्पावंती परिसरातील एक नामवंत विद्यालय असुन आमच्या पाल्यांच्या दर्जेदार शिक्षणाची काळजी घेते. हे बहुजन समाजातील गोरगरीब जनतेसाठी भूषणावह बाब असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. त्यावर आपले मत व्यक्त करताना श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर म्हणाले की, आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हा मला माझ्या आजोबापासून व वडीलांपासून प्राप्त झालेला वारसा आहे. तो मी अखंडपणे चालवीत राहील. यासाठी आपण आपले पाल्य निश्चिंतपणे या विद्यालयात पाठवावे. सर्वात चांगली गुंतवणूक ही आपल्या पाल्याच्या शिक्षणावर केलेली गुंतवणूक आहे. आपल्या भावना मुलांवर न लादता त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना शैक्षणिक कार्यात मदत करावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनीताई पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाल्या की, आपण आमच्या विद्यालयावर टाकलेला विश्वास पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही व आमचे शिक्षक कटिबद्ध आहोत. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बाबत काही सुचित करावयाचे असल्यास निस:संकोच सुचित करण्याचे त्यांनी पालकांना आवाहन केले. प्राचार्य तथा मुख्याध्यापक रामचंद्र हिरवे आपल्या आभारपर भाषणात म्हणाले की आपल्या काही सूचना असतील तर प्रत्यक्ष कार्यालयात येऊन मला केव्हाही सांगाव्यात. त्या सूचनांचे आम्ही स्वागत करू. या पालक सभेला मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी केले. राष्ट्रगीता नंतर पालक सभेची सांगता झाली. त्यानंतर वर्ग ५ ते १२ च्या वतीने राबविण्यात आलेल्या सर्व शालेय व सहशालेय उपक्रमाच्या सभागृहात लावलेल्या क्षणचित्रांची उपस्थित पालकांनी पाहणी करून अध्ययन व अध्यापनाबद्दल समाधान व्यक्त केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.